लंडन: आधी टेन्शनमुळे केस गळू लागतात आणि मग केस गळण्याचंच टेन्शन येऊ लागतं, असं केस गळतीबद्दल म्हटलं जातं. मात्र केस गळतीच्या या टेन्शनमधून लवकरच जगभरातील कोट्यवधी लोकांची सुटका होणाराय. कारण संशोधकांनी केस गळती रोखणाऱ्या औषधाचा शोध लावलाय. ऑस्टियोपोरोसिसच्या (हाडांशी संबंधित आजार) उपचारांसाठी हे औषध विकसित करण्यात आलं होतं. याशिवाय हे औषध केसांच्या वाढीसाठीदेखील गुणकारी ठरणार आहे. आरोग्याशी संबंधित असलेल्या 'PLOS बायोलॉजी' मासिकात एक संशोधन प्रसिद्ध झालंय. यामध्ये वे-316606 औषधाचा उल्लेख करण्यात आलाय. हे औषध केसांची मुळं मजबूत करण्यात गुणकारी ठरणार आहे. ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी यावर अभ्यास केलाय. सध्याच्या घडीला केसगळती रोखण्यासाठी केवळ मिनोक्सीडिल आणि फिनास्टेराईड या औषधांचा वापर केला जातो. मिनोक्सीडिल आणि फिनास्टेराईड या औषधांचे काही साईड इफेक्ट्स आहेत. यामुळे अनेकदा या औषधांचे अपेक्षित परिणाम पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे केस गळतीनं हैराण झालेल्यांकडे केशप्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो. त्यामुळे केसांची गळती रोखण्यासाठी नव्या औषधाची गरज व्यक्त केली जात होती. संशोधकांनी वे-316606 औषधाचा शोध लावल्यानं केसांची मुळं मजबूत होणार आहेत. त्यामुळे केस गळती रोखण्यात यश मिळेल. याचा फायदा जगभरातील कोट्यवधी लोकांना होणाराय.
'हे' औषध ठरणार केस गळतीवरील रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 10:34 AM