मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार अनेकदा साधारण वाटत असले तरिही दुर्लक्ष केल्यामुळे याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेकदा रूग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. पण येणाऱ्या काळात या आजारांना घाबरण्याची अजिबात गरज भासणार नाही. कारण डासांमुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक नवीन औषध तयार करण्यात येत आहे. या आजारांमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. हिच बाब लक्षात घेऊन अमेरिकन वैज्ञानिक एक असं औषध तयार करण्यासाठी काम करत आहेत. ज्यामुळे डासांच्या पैदाशीवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे.
यूनिवर्सिटी ऑफ अरिजोनाच्या संशोधकांनी या संशोधनाबाबत बोलताना सांगितले की, त्यांनी मादा डासांमध्ये एक प्रोटीन ब्लॉक केलं त्यामुळे मादा डासांनी जी अंडी दिली ती डिफेक्टिव्ह शेल्स असलेली अंडी होती. ज्यामुळे त्या भ्रूणाचा अंड्यांमध्येच मृत्यू झाला. यामुळे डासांच्या पैदाशीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं.
संशोधकांच्या टीमने असं सांगितलं की, जर असं औषध विकसित करण्यात आलं ज्यामध्ये या प्रोटीनचा समावेश असेल तर यामुळे मधमाश्या आणि इतर उपयोगी किटकांना नुकसान न पोहोचवता फक्त डासांवरच त्याचा परिणाम दिसून येईल. तर त्यामुळे वाढत्या मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारांवर नियंत्रण मिळवणं सहज शक्य होईल.
यूनिवर्सिटीतील केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या मुख्य रोजर मीसफेल्ड यांनी सांगितले की, संशोधकांकडून केलं जाणारं हे संशोधन संपूर्ण जगभरात फार उपयोगी ठरेल. यामुळे फक्त डासांच्या पैदाशीवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार नाही तर हा उपाय इतर अन्य उपायांपेक्षा सुरक्षित आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, डास जगभरातील सर्वात घातक किटकांपैकी एक आहेत. ऑर्गनायझेशनने मलेरियाच्या विरोधात वैश्विक प्रगती हळूहळू कमी होत आहे. 2016मध्ये जवळपास 216 मिलियन लोकं या आजाराने संक्रमित होत असतात. ज्यांमध्ये 4 लाख 45 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या लोकांमध्ये सर्वाधिक बालकं आणि लहान मुलांचा समावेश होता.
मीसफेल्ड यांनी सांगितले की, डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या ज्या पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. त्या अत्यंत जुन्या आहेत. अनेक दिवसांपासून तेच उपाय करण्यात येत असल्यामुळे डासांवरही त्याचा परिणाम होत नाही. त्यांनी सांगितलं की, या संशोधनादरम्यान ज्या मादा डासांवर ट्रिटमेंट केली होती. त्या मादा आपल्या संपूर्ण जीवनकाळामध्ये पुन्हा कधीच रिप्रोड्यूस करू शकणार नव्हत्या. हे संशोधन येत्या काळात मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांवर नक्कीच परिणामकारक ठरेल अशी आशा मीसफेल्ड यांनी दर्शविली आहे.