ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटमधून नवा व्हायरस तयार झाला आहे आणि तो वेगाने पसरत असल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य संस्थेने केला आहे. हा व्हायरस ब्रिटनच नाही तर युरोपमधील देशांसह ४० देशांमध्ये पसरत असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे जगात दोन लाटा एकाचवेळी येण्याची भीती देखील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नवा व्हेरिअंट डेन्मार्कमध्ये देखील वेगाने वाढत आहे.
भारतात ओमायक्रॉनच्या BA.1 प्रकाराचे अधिक रुग्ण आहेत. BA.1 हा Omicron चा मूळ प्रकार आहे. असे असलेतरी BA.2 भारतात देखील सापडला आहे. आतापर्यंत हा नवा व्हायरस 40 देशांमध्ये आढळला आहे, त्यापैकी बहुतेक नमुने डेन्मार्क, भारत, यूके, स्वीडन आणि सिंगापूरमध्ये सापडले आहेत. BA.2 सध्या भारतात आहे परंतु येथील बहुतेक लोकांना BA.1 ची लागण झाली आहे. स्टेटन सीरम इन्स्टिट्यूटचे संशोधक अँडर्स फॉम्सगार्ड यांच्या मते, BA.1 ची लागण झालेल्या लोकांना BA.2 ची देखील लागण होऊ शकते.
ज्या लोकांना ओमायक्रॉनची लागण झालीय, त्यांना पुन्हा दुसऱ्या व्हेरिअंटची बाधा होऊ शकते. असे झाले तर दोन लाटा एकाचवेळी डोके वर काढू शकतात, असे तज्ज्ञ म्हणाले. ओमायक्रॉनमधील एक बदल जो त्याला डेल्टापासून वेगळे पाडतो, हा बदल ओमायक्रॉनच्या दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये दिसत नाहीय. यामुळे त्याला ओळखणे कठीण होऊन गेले आहे. डॉक्टरांनुसार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनच्या दोन्ही सब व्हेरिअंटमध्ये खास फरक आढळलेला नाही.
रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत नाहीये. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की RT-PCR चाचणी BA.2 चा नमुना पॉझिटिव्ह दाखवण्यात यशस्वी ठरली आहे, परंतु या प्रकाराबाबत अद्याप अनेक गोष्टी उघड होणे बाकी आहे.