इंडोनेशिया : तुमचा २०१८ वर्षाचा नविन संकल्प ठरला का? २०१७ ला केलेला संकल्प पूर्ण झाला का? तुम्ही म्हणाल संकल्प हे फक्त नविन वर्षाला करण्यासाठी असतात. ते मुळीच पूर्ण करण्यासाठी नसतात. १ जानेवारीला केलेले संकल्प कुणी वर्षभरात पूर्ण करत नाहीत. संकल्प पूर्ण करणारे अपवादानेच सापडतात. असाच दोन सुंदर अपवाद आहेत इंडोनेशियात. या जोडप्याने मिळून तब्बल १८१ किलो वजन कमी केलंय. तुम्ही म्हणाल ठिके, यात एवढं काय इंटरेस्टिंग आहे? पण त्यांनी ज्याप्रकारे वजन कमी केलंय ते नक्कीच थक्क करणारं आहे.
मिरर यु.केने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचं नाव आहे लॅक्सी रीड आणि डेनी रीड. या दोघांचं २०१५ साली लग्न झालं. सुरुवातीपासूनच दोघंही अत्यंत स्थूल होते. लॅक्सीचं वजन २२० किलो आणि डेनीचं वजन १२७ किलो होतं. त्यांचं वजन दिवसेंदिवस वाढत जात होतं. त्यामुळे अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरत होते. तसंच वजनामुळे त्यांना मुल होण्यासही अडचण येत होती. याला कंटाळून त्यांनी २०१६ च्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा संकल्प केला. हा संकल्प त्यांनी तब्बल दोन वर्ष पाळला. त्याचा चांगला परिणाम दिसायचा तो दिसलाच. दोन वर्षात या जोडप्याने मिळून १८१ किलो वजन कमी केलं.
इन्स्टाग्रामवर लॅक्सीने याबाबत माहिती दिलीय. त्यांनी वजन कमी करण्याचा पूर्ण प्रवास इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असा कॅप्शन दिलाय की, आम्ही कोणताही डाएट प्लॅन नव्हता केला, तसंच कोणताही जिम ट्रेनर ठेवला नाही किंवा कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केलेली नाही. आम्ही फक्त रोज जिम करत होतो. जिममुळेच आम्ही दोन वर्षात वजन कमी केलंय, असं तिनं म्हटलं आहे.
त्या दोघांनीही आता आई-बाबा होण्याचे वेध लागले आहेत. पालक म्हणून त्यांना सुदृढ राहायचं आहे. म्हणूनच त्यांनी हे जिमींग पुढेही सुरुच ठेवलंय. त्यांनी त्यांची कहानी इन्स्टाग्रामवर अपलोड केली तेव्हा त्यांना अनेकांनी शभेच्छा दिल्या. त्यांचं अनेकांनी कौतुकही केलं आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. लॅक्सीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तब्बल ५ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. आपण एखादा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत करायला हवी. तरच संकल्प पूर्ण होतो. या जोडप्याने त्यांच्या वागण्यातून सगळ्यांना असाच संदेश दिलाय. एवढंच नव्हे, तर केवळ संकल्प पूर्ण करायचाय म्हणून मेहनत न करता या संकल्पाचा आपल्या आयुष्यात काहीतरी उपयोग होईल हेही प्रत्येकाने पाहिलं पाहिजे.