नव्या वर्षात प्रवेश करताना अनेकजण वजन कमी करण्याचा किंवा पोट कमी करण्याचा संकल्प करत असतात. जर तुम्ही सुद्धा २०२० मध्ये वजन कमी करण्याचा किंवा पोट कमी करण्याचा संकल्प करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला खास लक्षात ठेवाव्या लागतील. असंही म्हणता येईल की, या गोष्टी लक्षात ठेवल्याशिवाय तुम्ही वजनच कमी करू शकणार नाहीत.
अनेकजण वजन कमी करण्याचा संकल्प करतात. पण अर्ध्यातून हा संकल्प सोडतात. पण ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे त्यांनी खास डाएट प्लॅनसोबतच लाइफस्टाईलवरही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. पोटावरील चरबी वाढली की, महिला आणि पुरूष दोघांचाही लूक खराब होतो. अशात काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील.
चांगली झोप घ्या
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पुरेश झोप घेणे. खासकरून बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी किमान ७ तासांची झोप महत्वाची आहे. वजन कमी करण्यावर झोपण्याची वेळ आणि पद्घत याचाही प्रभाव पडत असतो. प्रयत्न करा की, रोज रात्री झोपण्याची तुमची वेळ एकच असावी. तसेच सकाळी लवकर उठण्याची सवय सुद्धा असावी. जे लोक वेळेवर झोपत नाहीत किंवा पुरेशी झोप घेत नाहीत त्यांचं वजन अधिक वाढतं.
हेल्दी वेट लॉस डाएट प्लॅन
अनेकदा वजन कमी करण्यासाठी लोक उपाशी राहतात. काही तरूणी तर जेवणही कमी करू लागतात. पण हे चुकीचं आहे. कारण कमी खाण्याची सवय तुमच्या वजनावर प्रभाव करत नाही. उपवास किंवा कमी खाण्याची सवय तुम्हाला कमजोर करू शकते. तुम्ही हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करायला हवा. यात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, फायबर आणि मिनरल्सचा समावेश असावा. एखाद्या डाएट एक्सपर्टकडून तसा चार्ट तयार करून घ्या.
पायऱ्यांचा वापर
अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये लोक पायी चालणे किंवा पायऱ्यांचा वापर करणे फारच कमी झालं आहे. लोक कुठेही जाण्यासाठी गाडीचा वापर अधिक करतात किंवा लिफ्टचा वापर करतात. पण जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर पायऱ्यांचा आणि पायी चालण्याचा पर्याय सर्वात बेस्ट आहे. सकाळी ४० मिनिटे पायी चालण्याची सवय लावा.
रात्रीचं जेवण लवकर करा
जास्तीत जास्त लोकांमध्ये लठ्ठपणाचं कारण हे त्यांचं रात्री उशीरा जेवण करणं असतं. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रात्री जास्त उशीरा जेवण करू नका. तसेच रात्री हलकं जेवण करावं, जे सहज पचेल. त्यासोबतच जेवण केल्यावर थोडावेळ पायी चालण्याची सवय लावा, लगेच झोपू नका.
वेळेवर जेवण
जेव्हाही वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा डाएट एक्सपर्ट्सही हाच सल्ला देतात की, वजन कमी करण्यासाठी वेळेवर जेवण करणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच पोटावरील चरबी कमी करण्यसाठीही हे महत्त्वाचं आहे. तसेच जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे नियमित नाश्ता करावा, वेळेवर जेवण करावं.