नवी दिल्ली : व्यस्त जीवनशैली आणि कामामुळे बहुतेक लोक आपली झोप पूर्ण करू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येतो. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीच्या नावाखालीही लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय लावत आहेत. पण, या आधुनिक सवयीमुळे आजारांना सामोरे जावे लागू शकते.
अलीकडेच, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले, ज्यामध्ये असे समोर आले की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. संशोधकांच्या मते, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांना इतर लोकांच्या तुलनेत आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त असतो. हे संशोधन अॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
हार्वर्ड मेडिसिन स्कूलमधील संशोधकांनी ६० हजार महिला परिचारिकांचा अभ्यास केला. रात्री काम करणाऱ्या परिचारिका कमी व्यायाम करू शकत होत्या आणि अनहेल्दी फूड खात होत्या. याचा त्यांच्या जीवनशैलीवर खोलवर परिणाम झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसा काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत रात्री जागून काम करणाऱ्यांना टाइप २ मधुमेहाचा धोका १९ टक्के जास्त असतो.
याचबरोबर, संशोधनात असे म्हटले आहे की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि दिवसा झोपतात, त्यांच्या झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया बिघडते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होते आणि टाइप २ मधुमेहासारखे गंभीर आजार होतात. तसेच, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्या चरबीच्या चयापचयात मोठा फरक असल्याचे संशोधनात शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.
काय आहे टाइप २ मधुमेह?मधुमेहाचे टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह बहुतेक लोकांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे होतो आणि टाइप २ मधुमेह खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील अडथळ्यामुळे होतो. टाइप २ मधुमेहामध्ये स्वादुपिंड आवश्यकतेनुसार इन्सुलिन तयार करू शकत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी जीवनशैलीचे पालन करून टाइप २ मधुमेह नियंत्रणात आणला जाऊ शकतो.