(Image Credit : www.parentcenternetwork.org)
तणाव किंवा उदासीनतेमुळे लहान मुलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कौशल्यात फार कमतरता बघायला मिळते. कारण अशा लहान मुला-मुलींना लोकांशी बोलण्यात आणि अभ्यास करण्यात समस्या होते. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, ६ ते १२ वर्षांपर्यतच्या तीन टक्के लहान मुलांना तणावाची समस्या असते. पण आई-वडील किंवा शिक्षक लहान मुलांची ही समस्या सहज ओळखू शकत नाही.
अमेरिकेतील मिसोरी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक किथ हर्मन म्हणले की, 'जेव्हा तुम्ही शिक्षक किंवा आई-वडिलांना त्यांच्या लहान मुला-मुलींमधील तणावाचा स्तर मोजण्यास सांगितलं जातं, तेव्हा त्यांची रेटींगमध्ये ५ ते १० टक्क्यांचा फरक असतो. उदाहरण द्यायचं तर शिक्षकांना हे माहीत असतं की, एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात मित्र बनवण्यात अडचण येत आहे. पण आई-वडील घरी या विषयावर लक्ष देऊ शकत नाहीत.
काय सांगतो रिसर्च?
अभ्यासकांनी या अभ्यासासाठी प्राथमिक शाळेतील ६४३ लहान मुला-मुलींच्या प्रोफाइलचं विश्लेषण केलं. त्यांनी सांगितले की, अभ्यासात ३० टक्के लहान मुलांमध्ये तणावाचं प्रमाण बघायला मिळालं. पण आई-वडील आणि शिक्षक हे लहान मुलांमधील तणाव किंवा त्याचा होणारो त्रास ओळखण्यात अपयशी ठरतात. हर्मन हे म्हणाले की, जी लहान मुलं तणावात होती, त्यांच्यात त्यांच्याच वयाच्या मुलांपेक्षा कमी कौशल्य बघायला मिळालं.
आकडेवारी काय सांगते?
जर आनंदाच्या क्षणी तुम्ही आनंदी होऊ शकत नाही आणि गंभीरातली गंभीर गोष्टीमुळे तुम्ही दु:खी होऊ शकत नसाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आङे. डॉक्टर सांगतात की, ही तणावाची किंवा डिप्रेशनची लक्षणे आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, जगभरात जवळपास ३५ कोटी लोक डिप्रेशनने ग्रस्त आहेत. यातील जास्तीत जास्त डिप्रेशनग्रस्त लोक हे विकसनशील देशात राहतात. भारतात साधारण ५ कोटी लोक डिप्रेशनने ग्रस्त असल्याचे सांगितले जाते.
काय आहेत लक्षणे?
जास्तीत जास्त वेळ निराश आणि उदास राहणे, कोणतही काम करण्यात रस नसणे, दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवणे, ज्या गोष्टीत आधी मन लागायचं त्यातून मन उडणे, विचार करण्यात, लक्ष केंद्रीत करण्यात आणि निर्णय घेण्यात अडचण येणे, आत्मविश्वास कमी असणे, नकारात्मक विचार करणे, भूक न लागणे, कधी कधी जास्त खाणे ही डिप्रेशनची लक्षणे मानली जातात.
कसा कराल बचाव?
जर एखाद्या लहान मुलांमध्ये अशी काही लक्षणे दिसत असतील तर वेळी त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जा. त्यांच्या सल्ल्याने अशा स्थितीत लहान मुलांसोबत कसं वागायचं हे जाणून घ्या. महत्त्वाची बाब म्हणजे आई-वडील आणि शिक्षकांची यात महत्त्वाची भूमिका असते. पण त्यांनी जर याकडे खास लक्ष दिलं नाही तर लहान मुलांची स्थिती फार जास्त बिघडू शकते. वेळीच जर त्यांना यातून बाहेर येण्यास मदत केली नाही तर त्यांच्या मनावर याचा फार जास्त वाईट प्रभाव पडू शकतो.