सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही. आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगली आणि शांत झोप अत्यंत आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, अर्धवट झोप घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही अनेक दिवसांपासून पूर्ण झोप घेत नसाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आरोग्य उत्तम आणि निरोगी राखण्यासाठी झोप पूर्ण करणं गरजेचं असतं.
काय म्हणतं संशोधन?
'स्लीप' नावाच्या जनरलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधनानुसार, ज्या व्यक्ती नियमितपणे 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोपतात. त्यांना कार्डियोवस्कुलर आजार होण्याचा धोका अधिक असतो. हृदयाचे आजार, ताण, डिप्रेशन, लठ्ठपणा इत्यादी समस्या कमी झोपेमुळे उद्भवतात.
हृदय आणि मेंदूवर परिणाम
कमी झोप घेतल्याने मेंदूवर परिणाम होतो. यामुळे अल्जायमर आणि डिमेंशिया यांसारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. तसेच हृदयावरही या परिणाम दिसून येतो. ब्रिटनमधील वार्विक मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, पूर्ण झोप न घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका 48 टक्क्यांनी वाढतो.
एकाग्रता कमी होते
जर तुमच्या चश्म्याचा नंबर सतत वाढत असेल तसेच तुम्हाला एखाद्या कामामध्ये एकाग्र होण्यासाठी अडथळे येत असतील तर हा झोप पूर्ण होण्याचा संकेत आहे. इंग्लंडमधील लॉगबारो यूनिवर्सिटीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, सतत काम केल्यामुळे एकाग्रता कमी होते आणि त्यानंतर यावर उपाय म्हणून कॉफीचे सेवन करण्यात येतं.
पचनक्रिया सुधारण्यासाठी
डाएटसोबतच अन्न पचवण्यासाठी झोप पूर्ण करणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुमची झप पूर्ण होत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो. यूनिवर्सिटी ऑफ विस्कोनसिन द्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्ती फक्त 5 तासांसाठी किंवा त्यापेक्षा कमी झोपत असतील तर त्यांच्या पोटाला नियमित करणारे पेप्टिन हार्मोनची निर्मिती 15.5 टक्क्यांनी कमी होतं. ज्यामुळे अन्न पचवण्यासाठी समस्या निर्माण होतात.
लठ्ठपणा वाढतो
कमी झोप घेणाऱ्यांचा बीएमआई (बॉडी मॉस इंडेक्स) 3.6 टक्क्यांनी वाढतो. स्टँडफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधकांनुसार, 5 तासांपर्यंत झोपणाऱ्या वोकांच्या कंबरेच्या आजूबाजूला फॅट्स वाढतात. तसेच या व्यक्तींना आरोग्याच्या अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो.