जगाच्या राशीला लागलेला कोरोना लवकर पाठ सोडण्याची काही चिन्हं नाहीत; मात्र आपण आता कोरोनाच्या बाबतीत पूर्वी येवढे अनभिज्ञ राहिलेलो नाही, हेदेखील महत्त्वाचे. कोरोनाशी लढताना अंतरभानाबरोबरच स्वच्छता, चाचण्या आणि लसीकरण यांचे महत्त्व देखील आपल्या लक्षात येऊन चुकले आहे.
सध्या कोरोना लढ्यात लसीकरण हे जरी महत्त्वाचे शस्त्र असले, तरी कोरोना रुग्णाची ओळख पटून त्याला तातडीने विलगीकरणात ठेवून, त्याच्यावर उपचार सुरू होणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जगभरात कोरोनाच्या चाचण्यांसाठी अनेक मार्गांचा वापर केला जात आहे; मात्र या सर्व चाचण्या वेळखाऊ, महाग आणि तज्ज्ञ लोकांच्या देखरेखीखालीच करण्याची गरज असणाऱ्या आहेत. अशावेळी अत्यंत सुलभ, वेगाने निदान करणाऱ्या आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणाऱ्या चाचण्यांची गरज लक्षात घेता, देश-विदेशातील शास्त्रज्ञ अशा चाचण्यांसाठी प्रयत्नशील आहेत.
अमेरिकन शास्त्रज्ञांनी पेन्सिलीच्या मदतीने कोरोनाची चाचणी करण्याची अभिनव आणि खात्रीशीर पद्धत शोधून काढली आहे. या चाचणीच्या मदतीने अवघ्या सात मिनिटात कोरोनाचे अचूक निदान करणे शक्य असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही चाचणी पद्धत शोधून काढली असून, सध्या उपलब्ध असलेल्या सर्व चाचण्यांपेक्षा, ही ग्राफाईटच्या मदतीने केली जाणारी चाचणी अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार असून, तिची किंमत भारतीय चलनात शंभर रुपये येवढी खाली आणणे शक्य होणार आहे. या चाचणीचे नाव ‘लिड’ Low-cost Electrochemical Advanced Diagnostic (LEAD) ठेवण्यात आले आहे.
या चाचणीत पेन्सिलमधील ग्राफाईटच्या काडीला इलेक्ट्रोडसारखे वापरण्यात येते. त्यानंतर या ग्राफाईट इलेक्ट्रोडला मानवी लाळ अथवा कोरोना चाचणीसाठी नाकातून घेतलेल्या सॅम्पल आणि human angiotensin-converting enzyme 2 बरोबर ठेवले जाते. त्यानंतर ग्राफाईट इलेक्ट्रोडला केमिकल सिग्नलला जोडून चाचणी केली जाते. चाचणीमध्ये या केमिकल सिग्नलद्वारे रुग्ण कोरोनाबाधित आहे का कोरोनामुक्त आहे, याची माहिती मिळवली जाते. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार या चाचणीमध्ये नमुना म्हणून मानवी लस वापरण्यात आली, तेव्हा १००% अचूक निदान प्राप्त झाले. तर नाकातील नमुना घेतल्यानंतर यशाचा आकडा ८८% अचुकतेपर्यंत पोचला. मुख्य म्हणजे ही चाचणी सामान्य माणूस कोणत्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय स्वत:च करू शकणार आहे.