कोरोनामुळे कोमामध्ये गेलेल्या एका नर्सला व्हायग्राच्या वापराने वाचविण्यात यश आले आहे. ३७ वर्षीय मोनिका अल्मेडा गेल्या ४५ दिवसांपासून कोमामध्ये होती. डॉक्टरांनी तिला व्हायग्राच्या मदतीने कोमातून बाहेर काढले. ही आयडिया मोनिकाच्या सहकाऱ्यांची होती. द सनमध्ये छापून आलेल्या एका वृत्तामध्ये या उपचाराबद्दल सांगितले आहे. मोनिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने डॉक्टर आणि तिच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाईल डिसफंक्शनच्या औषधाचा वापर केला.
मोनिकाची ऑक्सिजन लेव्हल निम्म्यापेक्षाही कमी झाली होती. तिची ऑक्सिजन लेव्हल सतत कमी होत होती. इंग्लंडच्या गेन्सबरो लिंकनशायरमध्ये राहणाऱ्या मोनिकाने सांगितले की, जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला डॉक्टरने सांगितले की, तुला व्हायग्राच्या मदतीने शुद्धीवर आणण्यात आले आहे. सुरुवातीला मला हे मस्करी वाटली. परंतू, मला त्यांनी व्हायग्राची जास्त मात्रा देण्यात आल्याचे सांगितले.
मोनिका ही एनएचएस लिंकनशायरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची सेवा करत होती. याचवेळी तिला ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण झाली. हळू हळू तिची तब्येत बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला तेथून डिस्चार्जही देण्यात आला.
मात्र घरी गेल्यावर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे तिला पुन्हा लिंकन काऊंटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उपचारावेळी ती १६ नोव्हेंबरला कोमात गेली. व्हायग्रामुळे रक्ताचे परिचलन चांगले सुरु राहते. तसेच फुफ्फुसामध्ये फोस्पोडायस्टेरियस एंजाइम बनविते, यामुळे रक्तवाहिन्या विस्फारतात आणि फुफ्फसाला आराम मिळतो. व्हायग्राचा डोस दिसल्यावर ४८ तासांत फरक दिसू लागला.