Rice Eating Tips : वजन कमी करणाऱ्या लोकांना नेहमीच असा प्रश्न पडलेला असतो की, भात खाल्ल्याने वजन वाढतं की नाही? अनेकांना असं वाटतं की, भात खाल्ल्यामुळे वजन वाढतं. अशात वजन कमी करणाच्या प्रयत्नात असलेले लोक भात खाणंच बंद करतात. इच्छा असूनही अनेकजण भात खात नाही. पण भाताने वजन वाढतं हा एक मोठा गैरसमज आहे.
न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात भात कसा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि त्याने वजन वाढतं हा कसा गैरसमज आहे हे सांगितलंय.
प्रशांत देसाई यांच्यानुसार, "भातामध्ये कार्ब्स असतात. याचीच लोकांना भीती वाटते. पण यासोबतच भातांमध्ये फायबर भरपूर असतं. जे एक महत्वाचं प्रोबायोटिक आहे. ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. पोट साफ होण्यास मदत मिळते. तसेच यात स्टार्च असतं जे शरीरासाठी फार महत्वाचं असतं. भात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी यांचं अवशोषण करण्यासाठी फायदेशीर असतं. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. महत्वाचा मुद्दा म्हणजे भात कधीही कोरडा खाऊ नका. जेव्हा भात डाळी किंवा इतर भाज्यांसोबत खाल्ला जातो तेव्हा त्याचे जास्त फायदे शरीराला मिळतात. पोट जास्त वेळ भरून राहतं".
कशासोबत खावा भात?
देसाई यांच्यानुसार, "भात कधीही डाळीसोबत, छोल्यांसोबत, राजम्यासोबत, अड्यांच्या भाजीसोबत, मास्यांसोबत खाऊ शकता. तसेच तुम्ही भात चिकन बिर्याणी किंवा मटण बिर्याणीच्या रूपातही खाऊ शकता. जेव्हा तुम्ही भात दुसऱ्या गोष्टीसोबत खाता तेव्हा तो एक संपूर्ण आहार बनतो. त्यामुळे भात नेहमी खा".
साऊथमधील लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?
काही दिवसांआधी एका एक्सपर्टनी सांगितलं की, साऊथमधील लोक भरपूर भात खातात तरीही त्यांना काही होत नाही किंवा ते लठ्ठही होत नाहीत. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.