How to eat Dry Fruits : ड्राय फ्रूट्स हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टर सुद्धा नियमितपणे ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला देत असतात. ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि अॅँटी-ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीराला भरपूर शक्ती मिळते. पचनक्रिया चांगली राहते आणि शरीराची रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते. तसेच आरोग्यासंबंधी अनेक समस्याही दूर होण्यास मदत मिळते. पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला ड्राय फ्रूट्सचं सेवन योग्य पद्धतीने करावं लागतं. अनेकांना ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे त्यांना फायद्यांऐवजी यांपासून नुकसानही होतं. त्यामुळे आज आम्ही ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
न्यूट्रिशनिस्ट सौम्या लुहाडिया यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, लोक ड्राय फ्रूट्स खाताना कोणती चूक करतात. त्यांच्यानुसार, "ड्राय फ्रूट्स कधीही स्नॅक्स सारखे खाऊ नयेत. ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. बरेच लोक एकाच वेळी भरपूर ड्राय फ्रूट्स खातात. अशात यांमध्ये भरपूर कॅलरी असल्याने डायबिटीस, पीसीओडी किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी ड्राय फ्रूट्स स्नॅक्ससारखे खाणं फायदेशीर ठरणार नाही. तुम्ही जर १०० ग्रॅम शेंगदाणेही खाल्लेत तर 500 ग्रॅम कॅलरी शरीरात जातात. त्यामुळे ड्राय फ्रूट्स योग्य पद्धतीने खाल्ले पाहिजेत. जसे की, सकाळी 4 ते 5 ड्राय फ्रूट्स खाऊ शकता किंवा ड्राय फ्रूट्सना तुमच्या जेवणात समावेश करू शकता. पण स्नॅक्ससारखे खूपसारे ड्राय फ्रूट्स खाऊ नये".
ड्राय फ्रूट्स खाता काय काळजी घ्यावी?
- काही ड्राय फ्रूट्समध्ये हाय शुगर असते ज्यामुळे यांचं जास्त सेवन कराल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते किंवा वजन वेगाने वाढू शकतं. खजूर, अंजीर आणि मनुक्यांमध्ये शुगर जास्त असते.
- रोज काजू खाणंही टाळलं पाहिजे. काजूमध्ये हाय कॅलरी आणि फॅट्स असतात. ज्यामुळे रोज काजू खाल्ल्याने वजन वाढू शकतं. तसेच हृदयाचं आरोग्य बिघडण्याचीही शक्यता असते.
- ड्राय फ्रूट्समध्ये हाय फायबर असल्याने पोट खराब होण्याचीही शक्यता असते. याने गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि जुलाब होण्याचाही धोका असतो.
- ड्राय फ्रूट्सचं जास्त सेवन केल्याने दातांचही नुकसान होऊ शकतं. याने दातांमध्ये कॅविटी किंवा दातांना किड लागण्याची शक्यता असते.