जर तुमचं वजन जास्त असेल तर याचा अर्थ केवळ तुम्ही जाड आहात, असा होत नाही. जास्त वजनासोबत जास्त आजार आणि वेगवेगळ्या समस्या सोबत येतात. जसजशा तुमच्या शरीरात फॅट सेल्स वाढत जातात, तसतशी तुमची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. मेटाबॉलिज्म स्तर बदलू लागतो, इंन्सुलिन वेगाने वाढू लागतो, हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं आणि या सर्व कारणांमुळे तुमचा कॅन्सरचा म्हणजेच कर्करोगाचा धोका दुप्पट वाढतो.
जाडेपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका ४० टक्के
शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांचा खासकरून कॅन्सरचा जाडेपणाशी काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी एका हेल्थ बोर्डाने अभ्यास केला. ज्याचे निष्कर्ष सांगतात की, जाडेपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका अलिकडच्या वर्षांमध्ये साधारण ४० टक्के वाढला आहे. इतकेच नाही तर तुम्ही जर जाडेपणाने ग्रस्त असाल, तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला एक नाही तर तब्बल १३ प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका अनेक टक्क्यांनी वाढतो.
६० हजार लोकांच्या तपासणीत १३ प्रकारचा कॅन्सर
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या एका अभ्यासानुसार, कॅन्सरने पीडित ज्या ६० हजार लोकांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात जाडेपणा आणि वजनाशी संबंधित समस्या एका समान धाग्यामुळे आढळल्या. या अभ्यासादरम्यान ज्या रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यांच्यात १३ वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळून आलेत. ज्यात ब्रेन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, गॉल ब्लाडर कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियाज कॅन्सर, कोलोन कॅन्सर, यूट्र्स कॅन्सर, ओवरीज कॅन्सर यांचा समावेश होता. जाडेपणासोबतच धुम्रपानही कॅन्सर होण्याचं एक मुख्य कारण आहे.
जगाची मोठी लोकसंख्या जाडेपणाची शिकार
यात जराही शंका नाहीये की, जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक आजार आहे ज्यामुळे शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं जातं आणि ज्यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचाही समावेश आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, जगातले दोन तृतियांश लोक जाडेपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत आणि यात वयस्कांसोबतच लहान मुलांचाही समावेश आहे. म्हणजेच काय तर जाडेपणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
वजन कमी केल्याने कॅन्सर होणार नाही?
(Image Credit : NBC News)
कॅन्सर हा केवळ जाडेपणामुळेच होतो असे नाही. याला इतरही अनेक कारणे असतात. यात वातावरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच तंबाखूचं सेवन आणि केमिकली प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टचं सेवन यामुळेही कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. पण जाडेपणा लाइफस्टाइलशी निगडीत एक मोठी समस्या आहे. यामुळेही कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे तुम्ही केवळ चांगले आणि दिसावे म्हणून वजन कमी करणेच महत्त्वाचे नाही तर वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठीही वजन कमी करणे गरजेचे आहे.
जाडेपणाची कारणे
जाडेपणा कमी करण्यासाठी कधी कुणी डाएट करतं, कधी कुणी केवळ फळं खातं, कुणी जिम लावतं तर कुणी धावायला जातं. असे वेगवेगळे उपाय अलिकडे प्रत्येक दुसरा किंवा तिसरा व्यक्ती करताना दिसतो. इतकी ही स्थूल होण्याची समस्या गंभीर झाली आहे. याला कारणेही तितकीच वेगवेगळी आहेत. जंक फूड, जेवणाच्या अनियमीत वेळा, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, शारीरिक हालचाली कमी होणे, व्यायाम न करणे, एकाच जागी बसून काम करणे अशी कितीतरी कारणे सांगता येतील.