नवी दिल्ली : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये (Omicron Variant) व्हायरसचा पहिला संसर्स झाल्यानंतर 90 दिवसांनी पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता तिप्पट आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी सांगितले. तसेच, या व्हेरिएंटबाबत व्हायरस आणि त्याचा प्रादुर्भावचा डेटा मिळण्यासाठी वेळ लागेल, मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन हा मुख्य व्हेरिएंट आहे, असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. त्या ओमायक्रॉनसंबंधी CNBC-TV18 शी बोलत होत्या.
डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, "डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनमध्ये संक्रमणाच्या 90 दिवसानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट आहे. दरम्यान, ओमायक्रॉन संसर्गाची क्लिनिकल वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी ही सुरुवातीची वेळ आहे. रुग्णांची संख्या वाढणे आणि रुग्णालयात दाखल होणे यात अंतर आहे. हा आजार किती गंभीर आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला रुग्णालयात दाखल होणाऱ्या दरांचा अभ्यास करण्यासाठी दोन ते तीन आठवडे वाट पाहावी लागेल."
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. रिपोर्टनुसार, याठिकाणी या स्ट्रेनची लागण झालेल्या मुलांची संख्या जास्त आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेतही चाचणी वाढवण्यात आली आहे, असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. याचबरोबर, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी निदर्शनास आणून दिले की, सध्या लहान मुलांसाठी फारशा लसी उपलब्ध नाहीत आणि फक्त काही देशांनी मुलांसाठी लसीकरण सुरू केले आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात. त्या म्हणाल्या, "मुलांसाठी फारशा लसी उपलब्ध नाहीत आणि फार कमी देश मुलांना लस देत आहेत. प्रकरणे वाढल्याने मुले आणि संसर्ग नसलेले लोक अधिक संक्रमित होऊ शकतात. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मुलांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आम्ही अजूनही डेटाची वाट पाहत आहोत."
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, "आम्हाला लसीकरणाबाबत सर्वसमावेशक आणि विज्ञानावर आधारित दृष्टीकोन घेण्याची गरज आहे. हा तोच व्हायरस आहे, ज्याचा आपण सामना करत आहोत आणि त्यामुळे त्याला रोखण्यासाठीचे उपाय तेच असतील. जर आम्हाला वेरिएंट लसीची गरज आहे, तर हे यावर अवलंबून असेल की, व्हेरिएंटमध्ये किती 'इम्यून एस्केप' आहे." याशिवाय, लसीकरण न केलेल्या लोकांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व देशांनी वय आणि क्षेत्राच्या आधारावर लसीच्या डेटाचा अभ्यास केला पाहिजे. संसर्ग कमी करण्यासाठी 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करणे हे प्राधान्य असले पाहिजे. असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.