नवी दिल्ली-
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी घातक असल्याचं याआधीच शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तसंच डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लागण झालेल्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण देखील खूप कमी असल्याचंही दिसून आलं आहे. ओमायक्रॉनची लागण झाल्यामुळे मृत्यू होण्याचा धोका देखील ५० ते ७० टक्क्यांनी कमी आहे. पण ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं देशात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR नं केलेल्या दाव्यानुसार ओमायक्रॉनची लागण झालेला रुग्ण बरं झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होत आहे. या अँटिबॉडी डेल्टासह कोरोनाच्या इतर व्हेरिअंटवरही प्रभावी ठरत आहेत.
संसर्गाची शक्यता होईल कमीआयसीएमआरचे वैज्ञानिक प्रज्ञा डी यादव, गजानन एन सपकाल, रीमा आर सहाय आणि प्रिया अब्राहम यांनी केलेल्या रिसर्चनुसार ओमायक्रॉननं संक्रमित लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगल्या पातळीवर वाढल्याचं लक्षात आलं आहे. डेल्टा आणि कोरोनाच्या इतर व्हेरिअंटविरोधात लढण्यासाठी या अँटिबॉडी सक्षम असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर संबंधित रुग्णाला डेल्टा विषाणूची पुन्हा लागण होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण ओमायक्रॉनमुळे शरीरात विकसीत झालेली अँटिबॉडी डेल्टासह इतर व्हेरिअंटचा खात्मा करण्यासाठी सक्षम आहे.
३९ जणांवर करण्यात आलं संशोधनरिसर्चमध्ये ३९ जणांचा समावेश करण्यात आला होता. यात भारतासह परदेशातील काही लोकांचाही समावेश होता. ३९ पैकी २८ जण संयुक्त अरब अमिरात, दक्षिण/पश्चिम/पूर्व आफ्रिका, मध्य पूर्व, अमेरिका आणि यूके येथून भारतात परतले होते. तर ११ जण त्यांच्या संपर्कात आले होते. हे सर्व जण ओमायक्रॉनचे रुग्ण होते.
यातील २५ जणांना कोविशील्ड लस देण्यात आलेली होती. तर ८ जणांनी फायझरची लस घेतली होती. ६ जणांनी कोणतीही लस घेतली नव्हती. कोरोनावर मात केल्यानंतर सर्वांमध्ये खूप चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
प्लास्टिक आणि त्वचेवर सर्वाधिक काळ जीवंत राहतो ओमायक्रॉनचा विषाणूजापानमधील क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनच्या रिसर्चनुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट प्लास्टिक आणि त्वचेवर १९३ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो. याशिवाय कोरोनाचा ओरिजनल व्हेरिअंट जीवंत राहण्याचा कालावधी ५६ तास इतका आहे. तर अल्फा व्हेरिअंटचा १९१ तास, बीटाचा १५६ तास, गामा व्हेरिअंटचा ५९ तास आणि डेल्टा व्हेरिअंटचा ११४ तास इतका कालावधी होता. त्वचेवर कोरोनाचा विषाणू जीवंत राहण्याचा कालावधी पाहायचा झाल्यास ओरिजनल व्हेरिअंट ८ तास, अल्फा १९.६ तास, बीटा १९.१ तास, गामा ११ तास, डेल्टा १६.८ तास आणि ओमायक्रॉन व्हेरिअंट २१.१ तास जीवंत राहू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.