केपटाऊन: कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. आफ्रिकेत आढळून आलेल्या व्हेरिएंटमुळे जगभरातील देश सतर्क झाले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी सीमा पुन्हा बंद करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टर एँजेलिक कोएत्जी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधून काढला. या व्हेरिएंटचा लोकांवर नेमका काय परिणाम होतो, याची माहिती त्यांनी दिली आहे.
आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून आली असल्याची माहिती डॉ. एँजेलिक कोएत्जी यांनी दिली. कमजोर लोकांनी नव्या व्हेरिएंटचं गांभीर्य ओळखून खबरदारी घ्यावी. या संदर्भात आणखी शोध घेण्याची आवश्यकता असल्याचं कोएत्जी म्हणाल्या.
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा वनच्या तुलनेत किती धोकादायक आहे, ते सांगण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे सध्या पुरेसा डेटा नाही. ओमायक्रॉन विरोधात लस कितपत प्रभावी ठरेल याबद्दलही जागतिक आरोग्य संघटनेला शंका आहे. याबद्दल अधिक तपशील गोळा करून संशोधन आवश्यकता असल्यानं संघटनेनं म्हटलं आहे.
डेल्टासह अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनमुळे अधित धोका असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम आढळून आला. त्या देशात बाधितांनी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. नवा स्ट्रेन लसीच्या प्रभावाला निष्प्रभ करू शकतो का, याचा शोध घेण्याचं काम जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या एका पथकानं सुरू केलं आहे.