कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर सध्या चर्चा होतेय. फार्मा कंपनी Moderna Incने सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन स्ट्रेनशी लढण्यासाठी एक नवीन लस आवश्यक असल्यास २०२२च्या सुरुवातीस तयार होऊ शकते.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन, जुन्या डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक मानला जातोय आहे आणि कोरोनाच्या सध्याच्या लसीचा त्यावर परिणाम होणार नाही अशी चिंता व्यक्त केली जातेय. यावर मॉडर्नाने गरज भासल्यास २०२२ च्या सुरुवातीस ते यासाठी लस तयार करू शकतात असं सांगितलं आहे.
सुमारे १४ देशांमध्ये पोहोचला नवा व्हेरिएंटओमायक्रॉन वेगाने पसरत असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत तो जवळपास १४ देशांमध्ये पोहोचला असल्याची माहिती आहे. याआधी जगाने कोरोना डेल्टा व्हेरिएंटने घातलेला धुमाकूळ पाहिला. अशा परिस्थितीत, अनेक देशांनी आधीच सावध होऊन ओमायक्रॉन टाळण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत.
WHOचं म्हणणं काय?प्राथमिक पुराव्यानुसार, ज्यांना आधी कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा लोकांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्ये पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांना सहज संसर्ग होऊ शकतो. WHOच्या म्हणण्यानुसार, "कोरोना लसीवर या प्रकाराचा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी WHO काम करत आहे. 'ओमायक्रॉन'मुळे अधिक गंभीर आजार होतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही."