नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. नवनवीन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमायक्रॉननंतर आता त्याचा सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 थैमान घातले आहे. आशिया आणि युरोपमधील बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची चौथी लाट कधीही येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत तज्ज्ञ वेगवेगळे दावे करत आहेत.
ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट आता पोटावर अटॅक करत असल्याचं समोर आलं आहे. फुफ्फुसाऐवजी शरीराच्या इतर भागांसाठी, प्रामुख्याने पोटासाठी घातक ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेआधी त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत तज्ज्ञांनी अलर्ट केलं आहे. तज्ज्ञांनी दावा केला आहे, बीए.2 हा व्हायरस फुफ्फुसाऐवजी पोटावर हल्ला करतो. या व्हायरसची लागण झाल्यास पोटात दुखणं, मळमळ आणि जुलाब यांसारखी लक्षणं दिसतील.
नव्या व्हेरिएंटमुळे थकवा खूप जाणवतो
लोकांनी अशी लक्षणं दिसल्यास खबरदारी घ्यावी आणि तब्येत जास्त बिघडल्यास डॉक्टरांना सल्ला घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अतिसार आणि पोटदुखी ही सामान्य लक्षणं होती. त्यामुळे व्हायरस आतड्यात पोहोचण्याची शक्यता असते. याशिवाय नव्या व्हेरिएंटमुळे थकवा खूप जाणवतो. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका असं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या BA.2 विषाणूची लक्षणे सौम्य असल्याचं सांगितलं असली तरीही हा समज महागात पडू शकतो. कारण या व्हायरसच्या संसर्गदर मोठ्या प्रमाणात असल्याचं इतर देशांतील रुग्णसंख्येवरून दिसत आहे. ज्या वेगाने कोरोना आता आपलं रूप बदलत आहे, त्याप्रमाणे या व्हायरसची लक्षणेही बदलत आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबतही वैद्यकीय तज्ञांकडून नवनवीन दावे केले जात आहेत. कोरोना विषाणूची लक्षणे ही प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असल्याचं याआधी अनेकदा दिसून आलं आहे. या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसून आली आहेत.