नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑगस्टपर्यंत कोरोनाची चौथी लाट येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाची चौथी लाट ही मुलांसाठी घातक ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांना मोठा प्रमाणात संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत मुलांना कोरोनापासून दूर ठेवणं, संक्रमणापासून वाचवणं हे एक आव्हान आहे. ओमायक्रॉन XE (Omicron XE) आणि बीए 2 (BA2 variant) या दोन व्हेरिएंटने कहर केला असून हे व्हेरिएंट आतापर्यंतचे सर्वांत जास्त वेगाने प्रसार होणारे व्हेरिएंट आहेत.
भारतात कोरोनाचा ओमायक्रॉन XE व्हेरिएंट दाखल झाला आहे. कोरोनाच्या बीए1 आणि बीए2 या दोन व्हेरिएंट्सचे एकत्रित हायब्रिड असे रूप म्हणजे ओमाक्रॉन XE आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा व्हेरिएंट 10 पट अधिक संसर्गजन्य आहे. चौथ्या लाटेमध्ये, या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका मुलांना आहे. भारतात लसीकरण मोहीम सुरू आहे. बहुतेक लोकांचे लसीकरण झाले आहे. परंतु मुलांना लसीकरण न केल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटपासून मुलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
'अशी' आहेत Omicron XE ची लक्षणं
Omicron XE प्रकाराची लक्षणे जाणून घेतल्याने तुम्हाला त्यावर वेळेत उपचार करण्यात मदत होऊ शकते, जेणेकरून संसर्गाचा प्रसार रोखता येईल आणि वेळेवर उपचार मिळतील. Omicron XE प्रकाराची लक्षणे ज्याकडे सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यक आहे ते म्हणजे ताप, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, त्वचेची जळजळ.
- खोकला आणि सर्दी.
- मधूनमधून तीव्र डोकेदुखी.
- घसा खवखवणे, बोलण्यात अडचण.
- शरीरात अचानक वेदना होतात.
- अस्वस्थता आणि भीती वाटणे.
मुलांचा असा करा बचाव
मुलांना चौथ्या लाटेत Omicron XE प्रकारापासून वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करा. झोपण्याची, खाण्याची ठराविक वेळ असावी, जेणेकरून त्यांच्या आरोग्याला फायदा होईल आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत होईल. लसीकरणास पात्र असलेल्या बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे. शाळेतील मुलांची स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंगची खबरदारी घ्यावी. लहान मुलांना काही त्रास झाला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.