- - डॉ. श्रुती पानसे (मेंदू आणि शिक्षण अभ्यासक)आज फुललेलं फूल काहीच काळाने कोमेजून जातं. आपल्या जगण्याबद्दल आणि त्यातल्या असंख्य आठवणींबद्दल हेच सत्य असतं. एकदा फूल कोमेजलं, की ते कसं कोमेजलं असं म्हणण्यात अर्थ नसतो. फुललेलं असतं तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जिवंत असतं.
असं म्हणतात की, आपण प्रत्येक क्षण जगायला हवा. प्रत्येक क्षणाला आपण सजग राहायला हवं। यालाच इंग्रजीत माइंडफुलनेस असं म्हणतात. अनेकदा आपण सवयीने काही गोष्टी करत राहतो. सवयीने जेवतो. काम करतो. एखाद्या छान गोष्टीचा आस्वादसुद्धा तितक्याशा सजगपणे घेत नाही. आला क्षण.. गेला क्षण... अशा पद्धतीने आपण जगत असतो आणि असं जगत असताना हे विसरूनच जातो की आत्ताचा क्षण हाच काय तो जिवंत आहे. अजून दोनच सेकंदांनी जेव्हा आत्ताचा क्षण मागे पडेल, तेव्हा तो क्षण असणार नाही, तर ती एक आठवण असेल. ‘आत्ता मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आहे, हे वाक्य दोनच मिनिटानंतर एक आठवण बनवून राहणार आहे.’ म्हणून प्रत्येक जिवंत क्षणाचं महत्त्व खूप मोठं आहे.
म्हणून दुसऱ्याच क्षणी भूतकाळात जमा होणारा तो क्षण जास्तीत जास्त छान, अर्थपूर्ण, समाधानात असला पाहिजे. एकदा का तो क्षण निघून गेला आणि त्या ‘क्षणा’चं रूपांतर ‘आठवणी’त झालं की मग आपल्याला काहीच करता येत नाही.
योग करतानासुद्धा सजगतेचं फार महत्त्व आहे. कुठलाच क्षण आला तसा जाऊ द्यायचा नाही. प्रत्येक श्वास हा काहीतरी सांगतो आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन काहीतरी घेऊन येतो आहे, ही जाणीव असणं म्हणजेच सजगता.
जर आपण तो तो श्वास, तो तो क्षण जगला, अगदी उत्कटतेने जगला, तर अशा क्षणांच्या आठवणी तितक्याशा पुसट होणार नाहीत. नवीन कोणतीही गोष्ट शिकताना, मुलं अभ्यास करत असतात तेव्हा, निसर्गात फिरताना अगदी रोजचं काम पुन्हा पुन्हा करतानाही प्रत्येक क्षणाकडे लक्ष हवं. प्रत्येकश्वासाकडे लक्ष हवं. हे केलं तर आठवणी निर्माण होतील; पण त्या सहजपणे पुसल्या जाणार नाहीत आणि हेच तर आपल्याला हवं असतं!..(shruti.akrodcourses@gmail.com)