मुंबई : जीवघेण्या क्षयरोगाला पूरक परिस्थिती मुंबईतील अनेक भागात आहे. अनेक भागात प्रदूषणामुळे तसेच हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे क्षयरुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे निरीक्षणातून समोर आल्याचे पालिकेने म्हटले आहे. एका क्षयरुग्णाकडून जवळपास १० ते १५ जणांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे खोकताना आणि थुंकताना काळजी घ्या, असा सल्लाही पालिकेने दिला आहे.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिका पत्रकार कक्षात शुक्रवारी मुंबई महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ. पुरी, डॉ. राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड साथीनंतर घराघरातील क्षयरुग्णांपर्यंत पोहोचणे पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना शक्य नव्हते. अशा काळात क्षयाचे रुग्ण शोधण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र, कोविड निर्बंध आणि इतर सवयींमुळे संसर्ग आजार बळावणेही कमी झाले होते. आता कोणालाही सदृश लक्षणे दिसत असतील तर टीबीचे निदान करणे सोपे झाले आहे. ३ ते ४ तासात तुम्हाला टीबी आहे हे सिद्ध करणाऱ्या चाचण्या पालिका केंद्रात उपलब्ध आहेत. रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून पालिका आरोग्य केंद्रात तत्काळ निदानासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असेही डॉ. गोमारे यांनी सांगितले. सीएसआर अंतर्गत क्षयरुग्ण उपचारासाठी ७ मशीन कार्यरत आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालयात कल्चर आणि डीएसटी लॅब जून २०२३ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. लहान मुलांसाठी जेजे आणि वाडिया रुग्णालयात बालरोग डीआरटीबी केंद्र आहेत.
थुंकणे टाळा, खोकताना रुमालाचा वापर करा पालिका आणि शासनाकडून कितीही उपाययोजना राबविण्यात आल्या तरी क्षयाचे प्रमाण रोखणे नागरिकांच्या हातीच आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या विभागात लोकांनी रस्त्यात थुंकणे टाळले, खोकताना तोंडावर रुमाल धरला आणि आवश्यक काळजी घेतली तेथे क्षयरुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुंबईसारख्या शहरात वावरताना प्रत्येकाने खोकताना आणि थुंकताना तोंडावर रुमाल आणि समोरच्या माणसानेसुद्धा काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही डॉ. गोमारे यांनी दिला आहे.