नवी दिल्ली – सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. अनेक रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. कोरोनाच्या या लाटेत रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मेडिकल ऑक्सिजनची गरज भासत आहे. गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या देशात ऑक्सिजन कंसंट्रेटरची मागणी प्रचंड वाढली आहे.
ऑक्सिजन कंसंट्रेटर कसं काम करतं?
ऑक्सिजन कंसंट्रेटर हे ऑक्सिजन सिलेंडरप्रमाणेच काम करतं. हे असं वैद्यकीय उपकरण आहे ज्यामध्ये आजूबाजूच्या हवेतील ऑक्सिजन घेते. पर्यावरणाच्या हवेमध्ये ७८ टक्के नायट्रोजन आणि २१ टक्के ऑक्सिजन वायू असतो आणि बाकीच्या वायूंचे प्रमाण केवळ १ टक्का आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटरने ही हवा आत घेतं त्यानंतर ती फिल्टर होते आणि नायट्रोजन परत हवेत सोडले जाते. या प्रक्रियेद्वारे, कंसंट्रेटरमध्ये वापरल्या जाणार्या ऑक्सिजनचा उपयोग करून रुग्णाच्या ऑक्सिजनची कमतरता पूर्ण केली जाते. ऑक्सिजन कंसंट्रेटर प्रतिमिनिटाला ५-१० लीटर ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतं. जवळपास ९०-९५ टक्के शुद्ध ऑक्सिजन पुरवठा यातून करण्याची क्षमता असते. ऑक्सिजन टँक अथवा सिंलेडर प्रमाणे हे रिफील करण्याची गरज भासत नाही. विजेवर २४ तास चालू शकते.
ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑनलाईन कसं खरेदी करू शकता?
ऑक्सिजन कंसंट्रेटर हे ऑनलाईन किंवा ऑफलाईनही खरेदी करू शकता. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स वेबसाईटवही हे उपलब्ध आहे. सध्या देशात ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सध्या काही ठिकाणी ऑक्सिजन कंसंट्रेटर आऊट ऑफ स्टॉक दाखवत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही अन्य वेबासाईटवरही ऑक्सिजन कंसंट्रेटर विक्री पाहू शकता. परंतु हे करताना तुमची फसवणूक होणार नाही ना याची काळजी घ्या
‘या’ वेबसाईट ऑक्सिजन कंसंट्रेटर विक्री करतात
1MG – ही वेबसाईट विविध कंपन्यांच्या ऑक्सिजन कंसंट्रेटर विकतं. याची किंमत ५० हजार ते ३ लाखापर्यंत असते.
Tushti Store: तुम्ही ऑक्सिजन कंसंट्रेटर याठिकाणी ६३ हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत खरेदी करू शकता.
Nightingales India: याठिकाणी ऑनलाईन पद्धतीने Philips, Oxymed, Devilbiss OC, Inogen, Olex OC अशा कंपनीचे ऑक्सिजन कंसंट्रेटर ३७ हजार ८०० ते २ लाख १५ हजारापर्यंत खरेदी करू शकता.
Colmed, Healthklin, Healthgenie यासारख्या वेबसाईटवरही Greens OC, Nidek Nuvolite, Devilbiss, and Yuwell या कंपन्यांचे ऑक्सिजन कंसंट्रेटर ३४ हजारापासून ते १ लाख २९ हजारापर्यंत खरेदी करू शकता.
अलीकडेच केंद्र सरकारने ऑक्सिजन कंसंट्रेटर वैयक्तिक वापरासाठी आयात करण्याची परवानगी ३१ जुलै २०२१ पर्यंत दिली आहे. त्यामुळे आता जर तुमचं कोणी नातेवाईक, मित्र परदेशात असतील तर त्याठिकाणाहून कुरिअर, ई कॉमर्स गिफ्ट पद्धतीने ते ऑक्सिजन कंसंट्रेटर मागवून घेऊ शकता.