थंडी पडायला सुरुवात झाली आहे हे आपल्या त्वचेवरुन लगेच कळते. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. थंडीत सर्वात मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे पायाच्या टाचांवर पडणाऱ्या भेगा. अनेकदा तर या भेगा इतक्या तीव्र स्वरुपाच्या असतात की टाचांवर जखमा दिसतात, टाचांना चीर पडते. हे सहन करणे कठीण होते आणि चालायलाही त्रास होतो. यासाठी थोड्या जरी भेगा दिसत असतील तर त्वरित इलाज करा नाहीतर हळूहळू या भेगा पूर्ण तळपायभर होतील.
पाय मुलायम व्हावे, सुंदर दिसावे म्हणुन आजकाल पार्लरमध्ये जाऊन पेडिक्योर करण्याचा ट्रेंड आहे. मात्र सगळ्यांनाच यावर पैसे खर्च करणे शक्य नसते. तरी काळजी करण्याची गरज नाही. अगदी पेडीक्योर सारखेच घरच्या घरीच तुम्ही पायांची निगा राखू शकता. ते कसे चला बघुया.
भेगांवर उपचार काय ?
नारळाचे तेल
नारळाच्या तेलात मॉइश्चर जास्त प्रमाणात असते. भेगांवर नारळाचे तेल लावल्यास त्वरित आराम मिळते. पायांची जळजळ कमी होते. कोमट पाण्याने पाय धुऊन ते वाळू द्या. यानंतर पायाला नारळाचे तेल लावा आणि मसाज करा. रात्री मोजे घालून झोपा. यामुळे लगेच फरक दिसायला लागेल.
पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली सारखे प्रोडक्ट तर साधारण प्रत्येकाच्याच घरी असते. रात्री झोपायच्या आधी पाय स्वच्छ धुऊन पेट्रोलियम जेली लावा. काही दिवसांतच भेगा कमी होतील.
लोणी
पायाला लोणी आणि हळद लावल्यास टाचा मुलायम होतील. लोण्यातही पुरेपुर मॉइश्चरायझर असते जे कोरडेपणा शोषून घेते.
क्रीम
जर अनेक घरगुती उपाय करुनही फरक दिसला नाही तर बाजारात मिळणारे क्रॅक क्रीम देखील चांगलेच उपायकारक आहे. बाहेर पडताना न चुकता मोजे घालूनच बाहेर पडा जेणेकरुन पायांचा धुळीशी संबंध येत नाही. तसेच घरातही धूळ येत असेल तर शक्यतो चप्पल घाला.