Parenting Tips : आपल्या पाल्याने चांगले उंच असावे. उंचीची चांगली छाप पडते, असे अनेकांना वाटते. मुलांमध्येही उंचीवरून न्यूनगंड तयार होतो. मात्र, कधी-कधी ही उंची पालकांच्या उंचीवर अवलंबून आहे, असा समज होतो. त्यातून उंची वाढविण्यासाठी नानाविध प्रयत्न पालक करतात. आपली जनुकं, ठेवण, आहार, व्यायाम आदी गोष्टींचा प्रभाव उंची वाढण्यामध्ये असतो.
अनेकदा मुलाची उंची वाढत नसल्याने पालक चिंतेत असतात. मात्र योग्य वयात उंची वाढण्यासाठी प्रयत्न केल्यास मुलांची वाढ होऊ शकते. त्यासाठी काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ‘काही मुलांची उंची अनुवांशिक असते. मात्र, बऱ्याचदा पोषक आहाराच्या अभावामुळेही उंची खुंटते. त्यामुळे आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांच्या समावेशाने उंची वाढण्यास मदत मिळते. त्याचबरोबर मुलांनी शरीराच्या स्नायूंना ताण देणारे व्यायामही करायला हवेत, असे मत जे. जे. रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड यांनी व्यक्त केले. दरम्यान, हार्मोन्स ग्रोथ वाढविण्यासाठी काही औषधे दिली जातात. ही औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्यावीत, असेही त्यांनी नमूद केले.
उंची वाढविण्यासाठी आपली हाडं, स्नायू अशा सगळ्या पेशी वाढायला हव्यात. त्यासाठी भरपूर प्रथिने, कॅल्शियमसारखे क्षार, ‘ड’ जीवनसत्त्वं, कॅलरीज पोषक घटक मिळायला हवेत.
पौष्टिक आहार-
१) शरीराची वाढ होण्यासाठी आहारही महत्त्वपूर्ण असतो. वाढत्या वयात सकस आहार मिळाल्यास मुलांच्या शरीराची चांगली वाढ होते.
२) त्यामध्ये मुलांना गायीचे तूप आणि दूध द्यायला हवे. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांना भरपूर फळे, कलिंगड, खरबूज यासारखी पाणीदार फळे द्यायला हवीत.
३) जेवणात सलाड, प्रथिनयुक्त ३ डाळींचा समावेश असावा. त्याचबरोबर पालेभाज्यांचाही समावेश असावा. यातून शरीराला पोषक घटक मिळून वाढीला मदत होते.
४) त्याचबरोबर व्यायामही महत्त्वाचा असतो. शरीराच्या स्नायूंना ताण देणारे व्यायाम फायदेशीर असतात.
५) तसेच चपळता वाढविणाऱ्या खेळांचाही फायदा होतो. त्यामुळे मुलांनी व्यायामाकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.