मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात. मग अनेक पालकांची कसरत सुरू होते. त्यांना खाऊ घालण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. कधी त्यांना काऊ-चिऊच्या गोष्टी सांगतात तर कधी मोबाईल, टिव्ही समोर बसवून जेवण भरवतात. एवढं करूनही मुलं बऱ्याचदा दाद देत नाहीत. अशावेळी नाइलाजाने पालक त्यांच्यावर दमदाटी करून किंवा प्रसंगी जबरदस्ती करून त्यांना खाऊ घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलांना असं जबरदस्तीने खाऊ घालणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं आम्ही नाही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, जर मुलांना जबरदस्तीने जेवण भरवत असाल तर ते त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या तोंडात घास कोंबून त्यांना जेवणं भरवत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, असं केल्यामुळे मुलांना फार कमी वयातच लठ्ठपणासारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. जे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते.
मुलांच्या जेवणावर करण्यात आलेलं हे संशोधन 'पीडियाट्रिक सायकोलॉजी' नावाच्या एका जर्नलमधून प्रकाशित करण्यात आले होते. हे संशोधन दीर्घकालीन चालणाऱ्या अध्ययनाचा हिस्सा असून यातंर्गत अनेक वर्षांपर्यंत मुलांच्या मनोवैज्ञानिक तसेच मनोसामाजिक विकासावर अभ्यास करण्यात येतो. संशोधनानुसार, जर मुलांना ताटातील खाद्यपदार्थ संपवण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असेल तर ते आपल्या शरीराचे संकेत ओळखू शकत नाहीत. तुमच्या धाकापोटी मुलं भूक नसतानाही ते संपवण्याचा प्रयत्न करतात.' त्यांची भूक वाढविण्यासाठी किंवा त्यांना योग्य आहार देण्यासाठी त्यांना स्वतःला ठरवू द्या की, त्यांनी किती जेवण जेवण्याची गरज आहे.
संशोधनाचे परिणाम
नॉर्वे यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्रोफेसर सिल्जे स्टेनस्बेक यांनी सांगितल्यानुसार, 'काही मुलांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय इतर मुलांच्या तुलनेमध्ये का वाढतं? याचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या दैनंदीन जीवनाचा अभ्यास केला तसेच त्याची टीव्ही पाहण्याची वेळ आणि भूक या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केलं.
स्टेनस्बेक यांनी सांगितल्यानुसार, संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली की, त्या मुलांमध्ये बीएमआयची वाढ झाल्याचे दिसून येते ज्यांना जबरदस्तीने जेवणं संपवायला सांगितलं जातं. ते किती खातात हे त्यांच्यानुसार भूकेनुसार ठरवले जात नाही तर जेवण पाहून किंवा त्याच्या गंधानुसार ठरविले जाते.