रुग्णांच्या नातेवाईकांकडून साफसफाई
By admin | Published: February 02, 2016 12:15 AM
जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनाच वॉर्डबॉयने सांगितल्याने वार्डामध्ये झाडू मारत साफसफाई करावी लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे काही नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनाच वॉर्डबॉयने सांगितल्याने वार्डामध्ये झाडू मारत साफसफाई करावी लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे काही नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जिल्हा रुग्णालयात नेहमी कोणत्या न कोणत्या प्रकारे वाद विवाद होत असतात. येथे कधी वेळेवर उपचार मिळत नाही तर कधी डॉक्टर नसल्याने वाद होतात. कधी-कधी औषधी मिळत नसल्याच्याही तक्रारी असतात. अशा वेगवेगळ्या कारणांनी जिल्हा रुग्णालय गाजत असते. सोमवारी तर येथे चक्क वॉर्ड बॉयने रुग्णांच्या नातेवाईकांनाच झाडू मारायला सांगितले. वॉर्ड क्रमांक १४ मध्ये दाखल रुग्ण व नातेवाईक वॉर्डात असताना दीड वाजेच्या सुमारास येथे वॉर्डबॉयने रुग्णांच्या नातेवाईकांना झाडू मारुन साफसफाई करण्याचे सांगितले. यातील काही रुग्णांच्या नातेेवाईकांनी तसे केलेही. मात्र काही जणांनी त्यास नकार देत हे वॉर्ड बॉयचेच काम असल्याचे सांगितले. त्यावेळी संबंधित वॉर्डबॉयने उद्धट भाषा वापरत तुम्ही कोणालाही सांगा, काही होणार नाही, असे बोलल्याचे जमनाबाई सोनवणे (शिरसोली) यांचे नातेवाईक सुनील सोनवणे यांनी सांगितले. या बाबत वॉर्डबॉयने सांगितले की, मी केवळ रुग्णांच्या कॉटजवळचा कचरा काढण्यास सांगितले. केवळ सकाळी झाडू मारला जातो, मी तरी साफसफाईसाठी पुन्हा दुपारी झाडू मारत आहे, असे वॉर्डबॉयचे म्हणणे होते. येथील रुग्णांचेच नातेवाईक सुनील कुमावत यांनीही याबाबत संताप व्यक्त केला. या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, संबंधित वॉर्डबॉयला समज देण्यात येईल व असा प्रकार न करण्याचे सांगतो, असे सांगितले.