Hair fall after Corona Recovery कोरोनातून (Corona Virus) बरे झाल्यावर लोकांना वेगळ्याच टेन्शनने सतावले आहे. थकवा, हाडांचे विकार, डोकेदुखी, ब्लॅक फंगसच्या उच्छादानंतर आता रुग्णांचे केस वेगाने गळत असल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांकडून केस गळतीच्या(Hair Fall) तक्रारींमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. डॉक्टरांनीच आज याची माहिती दिली आहे. (Hair Fall problem arise in Corona Patient after treatment. )
सामान्यपणे या हॉस्पिटलमध्ये आठड्याला 4 ते 5 रुग्ण केस गळत असल्याच्या तक्रारी घेऊन यायचे. मात्र मे महिन्याच्या मध्यावर हे रुग्ण वाढू लागले. यामध्ये बहुतांश रुग्ण हे कोरोनातून बरे झालेले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर साधारण एक महिन्याने ही समस्या उद्भवत आहे. काही रुग्णांना कोरोनाची लागण झालेली असताना केस गळतीचा अनुभव आला आहे.
डॉक्टरांनी सांगितले कारण...कोरोनामध्ये तणाव, जेवनाच्या वेळात बदल, जेवनात बदल, व्हिटॅमिन डी, बी 12 ची कमतरता आदींमुळे ही केस गळती होत असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. प्लास्टिक सर्जरीचे डॉ. शाहीन नूरेज़दान यांनी सांगितले की, केस गळतीचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. कोरोना नंतरची सूज हे देखील एक कारण असेल. पौष्टिक खाद्यपदार्थ न खाणे, वजनात अचानक बदल, हार्मोनल बदल आदी कारणे यामागे आहेत.
काय उपाय कराल...डॉक्टरांनी सांगितले की, कोरोना संक्रमणातून बरे झाल्यावर व्हिटॅमिन आणि आयर्नने युक्त नैसर्गिक खाद्य पदार्थ, फळे यांच्या सोबत पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. लोहाच्या कमतरतेमुळे देखील केस गळू शकतात. प्रोटीन युक्त, संतुलित आहार केस गळती कमी करेल. पौष्टिक आहार सुरु केल्यावर 5 ते 6 आठवड्यांनीसुद्धा केस गळायला लागले तर डॉक्टरांशी संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.