- डॉ.शर्वरी अभ्यंकर काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या महिला स्पेशल पुरवणीमध्ये एका फॅशन शोचे फोटो आले होते. फॅशन शो नेहमीसारखाच होता पण त्यामधील एका मॉडेलच्या फोटोनं मात्र चांगलंच लक्ष वेधून घेतलं. ती स्त्री मॉडेल अतिशय आत्मविश्वासानं रॅम्प वॉक करत होती तेही तिच्या पूर्ण वाढलेल्या दाढी आणि मिशांसह. हो तुम्ही बरोबरच वाचले... स्त्री मॉडेल आणि पूर्ण वाढलेली दाढी आणि मिशी???
मी कुतुहलापोटी त्या मॉडेलची अधिक माहिती काढली... तर ती युके मध्ये राहणारी भारतीय मॉडेल हरमन कौर होती आणि वयाच्या 11 व्या वर्षापासून PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिन्ड्रोम या विकारानं ग्रस्त होती. या विकाराचा परिणाम म्हणून तिच्या चेहऱ्यावर पुरुषांसारखी दाढी वाढली होती. परंतु याही अवस्थेत सौंदर्याचे सर्व निकष तोडून ती आज एक प्रसिद्ध मॉडेल आहे, तिच्या या फायटिंग स्पिरिटला मी मनापासून सलाम. एकदा माझ्याकडे नेहमी येणाऱ्या पेशंट ,त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीला, सोनालीला (नाव बदलले आहे) घेऊन आल्या. नेहमी हसत मुख, बडबडी असणारी सोनाली त्या दिवशी मात्र अगदीच उदास दिसत होती, खांदे उतरलेले होते. विचारलं तर तिची आई सांगू लागली, 'अहो काय झालंय हिला बघा ना, कॉलेजमध्ये जायचं नाही म्हणते, सतत चिडचिड करते. जरा काही बोललं की रडायला लागते. पाळीसुद्धा अनियमित झाली आहे तिची.'
सोनालीला विचारलं तर तिला रडूच कोसळलं. रडत रडत सांगायला लागली. 'मॅडम बघा ना माझं वजन वाढत चाललंय. चेहऱ्यावर अचानक पिम्पल्स येऊ लागलेत, केसदेखील उगवताहेत. मला मित्र-मैत्रिणी हसतात. कोणाशीही बोलायला गेलं तर माझ्या हनुवटीवर वाढणाऱ्या केसांकडेच बघतात, असं मला वाटतं. कुठेही जावंस वाटत नाही. मला माझीच खूप लाज वाटते.'पूर्ण परीक्षणा अंती तिचे PCOS हे निदान झाले. औषध, आहार, विहार आणि योग कॉउंसेल्लिंग ने सोनाली आता हॅप्पी आहे. काय आहे हे PCOS? आज सरासरी 10पैकी 1 स्त्री या PCOSनं पीडित आहे. इतका हा व्याधी कॉमन झालाय. 15 ते 45 या वयोगटातील कोणत्याही स्त्रीला PCOS चा त्रास होऊ शकतो.
PCOS - Polycystic ovarian syndrome म्हणजे काय?सामान्यतः स्त्रीयांच्या बीजकोषात (ओव्हरी) दर महिन्याला एका ग्रंथीची निर्मिती होते. ही ग्रंथी महिन्याच्या मध्यावर फुटून त्यामधून बीजांड (ओव्हम) बाहेर येते. PCOS मध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही ग्रंथी फुटतच नाही, यामुळे बीजांड बाहेर येत नाही. तसंच अंडाशयात (ओव्हरी) अशा अनेक ग्रंथींची निर्मिती होतच राहते. म्हणून याला पोलि (अनेक) सिस्टिक (ग्रंथी) ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतात
लक्षणं : - अनियमित पाळी, पाळीच्या वेळी अनियमित रक्तस्त्राव- वजन वाढणं, विशेष करुन ओटी पोटाभोवती जाडी अधिक वाढणे- चेहऱ्यावर, ओठांच्या वर , हनुवटीवर केस उगवणे- हातापायावर नेहमीपेक्षा अधिक केस उगवणे- चेहऱ्यावर पिम्पल्स येणे- सतत मूड बदलणे, चिडचिड होणे, सारखे रडू येणे- बद्धकोष्ठता - मानेची, काखेची, मांड्यांची त्वचा काळी पडणे - केस गळणे- डिप्रेशन येणे- गर्भ न राहणे- इन्सुलिनच्या कार्यात अडथळा येणे, रक्तातील साखर वाढणे, इत्यादी
मॉडर्न सायन्स अनुसार ही व्याधी पूर्णतः हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो. परंतु आर्युवेद या हार्मोन्सच्या असंतुलनाचे सुद्धा कारण देतो. अॅलोपॅथी प्रमाणे याची ट्रिटमेंट हार्मोन्स थेरपी देऊन केली जाते. परंतु, मिळणारे परिणाम हे तात्कालिक असतात, तसंच त्यांचेही दुष्परिणाम भोगावे लागतात ते वेगळंच.आर्युवेद प्रमाणे PCOS हा कफ आणि वात या दोषांचा व्याधी आहे. एका जागी बसून काम करणं, आहारात दूध किंवा दूधाच्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे ( उदा.पनीर, बटर, चीज ), शीतपेये, मैदा आणि मैद्याचे पदार्थ ( ब्रेड,बिस्किट), अजिबात व्यायाम न करणे या सर्व कारणांमुळे शरीरात कफ दोष फाजील प्रमाणात वाढतो, यामुळे जठराग्नी (digestive fire) मंदावते आणि खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन न होऊन आम विषाची (विषारी द्रव्य ) निर्मिती होते. वाढलेला कफ आणि आम विष स्त्रीयांच्या बिजांडामध्ये शिरुन तिथे अनेक ग्रंथींची उत्पत्ती करतात .(Poly cystic ovary).शरीरातील प्रत्येक हालचाल हे वात दोषाचे कार्य आहे, प्रत्येक महिन्याला अंडाशयात ग्रंथीची वाढ होऊन ती योग्य वेळी फुटणे आणि त्यातून बीजांड बाहेर येणे हे शरीरातील अपान वायुचे कार्य आहे. परंतु वाढलेला कफ दोष वाताच्या या कार्यात अडथळे निर्माण करतो आणि PCOS या व्याधीची उत्पत्ती होते.
चिकित्सा :सर्व प्रथम व्याधीचे जे हेतू (कारणे) पूर्ण बंद करावेत. मॉडर्न सायन्स ज्याला हार्मोन्स बॅलन्स साधणे म्हणतो तिथे आर्युवेद दोषांचा विचार करुन त्यांचे संतुलन साधण्याचे प्रयत्न करतो. PCOS मध्ये वात दोष हा कफामुळे पूर्णपणे आवृत्त झालेला असतो, हे आवरण काढण्यासाठी आधी पंचकर्म केले जाते. पंच कर्मातील वमन आणि योग बस्ती हे प्रकार या व्याधीत खूप चांगले परिणाम दाखवतात.कफ दोष कमी करणारी, जठराग्नी उद्दीपित करणारी आणि वाताचे कार्य सुरळीत करणारी अशी औषधांची योजना केली जाते. उदाहरणार्थ त्रिकटू (सूंठ, मिरी, पिंपळी), हिंग, कुमारी (कोरफड), इत्यादीआरोग्य वर्धिनि, हिंग्वाष्टक चूर्ण, चंद्रप्रभा रस, दशमूल, शतावरी, अश्वगंधा ही औषधे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतली तर आणि तरच (व्हॉट्स अॅप डॉक्टरच्या सल्ल्यानं नाही)PCOS शी सहज दोन हात करता येऊ शकतात. औषधांबरोबरच आहार आणि विहार यांवरही लक्ष ठेऊन त्यात बदल करणे हे PCOS व्याधीवर मात करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यात जर बदल नाही केला तर PCOS बरा होणे कठिण आहे.लक्षात ठेवा PCOS हा पूर्णपणे नियंत्रित करता येतो पण जर आहार आणि विहाराचे व्यवस्थित पालन नाही केले तर आयुष्याच्या कोणत्याही वळणावर हा पुन्हा आपल्या भेटीस येऊ शकतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत कायमचे बदल करणे गरजेच ठरते
आहार : - अती गोड, दुधाचे आणि मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत किंवा प्रमाणात सेवन करावे- शीतपेये पूर्णपणे बंद करावीत- रोज सकाळी गरम पाणी प्यावे- पोट साफ राहिल याकडे लक्ष ठेवावे
विहार : - योग साधनेच्या सहाय्यानं PCOS खूप छान नियंत्रित करता येतो. - योगमध्ये फक्त शरीराचाच नाही तर मनाचा, व्यक्तिमत्त्वा चा विचार केला जातो- पचनसंस्थेवर काम करणारी आसने उदा. पवनमुक्तासन, द्रोणासन- पोटावर झोपून केली जाणारी आसने उदा. नौकासन, धनुरासन- यकृत आणि स्वादुपिंडला उदिद्पित करणारे मत्स्येन्द्रासन - ओटी पोटावर दाब देणारे वज्रासनस्थ/ पद्मासनस्थ योग मुद्रा या सर्व आसनांचा खूप छान फायदा होतो- कपालभाती, धौती या शुद्धी क्रियांमुळे पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास खूप मदत होते आणि वाढलेला कफ दोषही कमी होतो.- प्राणायाम (अनुलोम-विलोम, भस्त्रिका, सूर्यभेदन), ध्यान yamule सतत बदलणाऱ्या मूड्सना सांभाळणे सोपे जाते.- झोप सुधारते आणि हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते.- योग साधनेमुळे कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा मिळवता येतो, व्याधी बद्दलची स्वीकार भावना वाढते आणि शरीर व मन दोघंही व्याधींशी लढण्यास एकत्र तयार होतात.
हरमन कौर या मॉडेलनं PCOSशी आत्मविश्वासाने लढा दिला. यूकेमध्ये तिचा दाढीसह स्वीकारही केला गेला. पण आपल्याकडे अशा किती सोनाली असतील ज्या या व्याधीमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसल्या आहेत. कोणत्याही व्याधीशी लढण्यासाठी रुग्णाची तयारी असणे महत्त्वाचे आहेच पण त्याला जर समाजाने, मित्र-मैत्रिणींनी योग्य साथ दिली तर हा लढा खूप सुसह्य होऊ शकतो. मान्य की PCOS हा जीवघेणा आजार नाही पण त्यामुळे येणारे डिप्रेशन तर जीवघेणे ठरू शकते. वंध्यत्व आयुष्य नकोसे करून टाकते.तेव्हा मित्रमैत्रिणींनो, समाजाची साथ असो किंवा नसो. या लढ्यात तुमच्यासोबत आर्युवेद आणि योग नक्कीच आहेत. तेव्हा त्यांची मदत घ्या आणि आत्माविश्वासानं PCOSला सामोरं जा.
- डॉ .शर्वरी अभ्यंकर BAMS. CGO. MA (Yoga shastra)