घड्याळीच्या काट्यावर चालणारी लाइफस्टाइल अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आली आहे. तर अनेक वाइट गोष्टी. खासकरून आरोग्यासंबंधी समस्यांनी मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं आहे. वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यात सर्वात जास्त लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वात जास्त कशाचा फटका बसत असेल तर ते आहे डिप्रेशन. डिप्रेशन ही समस्या तरूणांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. यावर वेगवेगळे उपायही आहेत. या उपायांमध्ये आणखी एका रिसर्चची भर पडली आहे.
एका रिसर्चनुसार, ज्या लोकांमध्ये आनुवांशिक रूपाने सकाळी लवकर उठण्याची सवय असते, त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं असतं. या लोकांना सिजोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारखे मानसिक विकार होण्याचा धोकाही कमी असतो. नेचर कम्युनिकेशन नावाच्या एका मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये 'बॉडी क्लॉक' संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे की, सकाळी लवकर उठणे याचा मानसिक आरोग्य आणि आजारांशी कसा संबंध आहे.
डायबिटीज किंवा जाडेपणाशी संबंध नाही
या रिसर्चमधील निष्कर्षांचा डायबिटीज किंवा जाडेपणा सारख्या आजारांशी कोणताही संबंध असल्याचा खुलासा झाला नाही. जसे की, याआधी असा अंदाज व्यक्त केला जात होता. ब्रिटनमध्ये एक्सटर विश्वविद्यालय आणि अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 'बॉडी क्लॉक' साठी शरीराच्या मदतीत डोळ्यांच्या रेटीनाची महत्त्वाची भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सकाळी लवकर उठण्याचे फायदे
१) सकाळी लवकर उठल्याने स्वच्छ ऑक्सिजन मिळतं. यामुळे श्वासासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो आणि फफ्फुसंही चांगले राहतात.
२) सकाळी उठून व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे हृदय निरोगी राहतं.
३) अनेक मानसिक आजारांपासून बचाव होतो. तसेच सकाळी उठून योग्याभ्यास करण्याचेही अनेक फायदे आहेत.
४) सकाळी लवकर उठल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं, यामुळे काम करण्यात अधिक लक्ष लागतं. म्हणजे कामही चांगलं होतं आणि आनंदही मिळतो.
सकाळी जबरदस्तीने उठण्याचे नुकसान
ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीतील संशोधिका कॅथरीना वुल्फ यांच्यानुसार, जेव्हा एखाद्याला जबरदस्तीने त्याच्या बॉडी क्लॉक विरूद्ध सकाळी लवकर उठण्यास किंवा जागण्यास सांगितलं जातं तेव्हा याचाही वाइट प्रभाव पडतो. शरीरासोबत केलेली जबरदस्ती कधीही फायद्याची ठरत नाही. लोकांना त्यांच्या सिर्काडियन क्लॉक म्हणजेच शरीराच्या जैविक घड्याळीप्रमाणे सगळं करू दिलं, तर त्यांचं परफॉर्मंन्स चांगलं होतं. रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्याला सकाळी लवकर उठण्यास सांगण्यात आलं तर त्याला आळस आलेला असेल. त्याचं कामात अजिबात लक्ष लागणार नाही. मेंदूचाही वापर तो चांगल्याप्रकारे करू शकणार नाही आणि अशात त्याचं वजन वाढू शकतं.