अनेक व्यक्तींना वेगवेगळे छंद जोपासण्याची सवय असते. त्यामध्ये अनेक गोष्टी येतात. काहींना गाणी आवडतात, काहींना वेगवेगळे चित्रपट पाहण्याची सवय असते, तर काहींना काही वस्तू जमा करण्याची सवय असते. अशातच अनेक लोकांना वस्तू जमा करायला आवडतात परंतु, घरातील किंवा त्यांच्याजवळील जुन्या वस्तू टाकून देणं त्यांना शक्य होत नाही. त्यांना त्या वस्तू फेकून देताना एक प्रकारची भिती वाटते. ही एक सायकॉलॉजिकल समस्या असून याला 'होर्डिंग' असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे असं करणाऱ्या व्यक्तीला 'होर्डर' असं म्हटलं जातं. अशा लोकांना आपल्याला आवश्यक नसणाऱ्या गोष्टी किंवा वस्तू फेकून देतानाही त्रास होतो. जर ही वस्तू मी आता फेकून दिली आणि तिची नंतर गरज लागली तर? यांसारखे प्रश्न त्यांना त्रास देत असतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.
काय होतो प्रभाव?
'होर्डिंग' करणाऱ्या व्यक्तींना याबाबत माहिती नसते की, त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय प्रभाव पडत असतो. यामुळे त्यांच्या भावनात्मक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक गोष्टींवर प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे पीडित व्यक्तींसोबतच त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनाही हा त्रास होऊ लागतो. वस्तू जमा करण्याच्या सवयीचा यांच्यावर इतका परिणाम होतो की, ते आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतच, स्वतःपासूनही दूर जाऊ लागतात. अशा लोकांना साधारणतः न्यूजपेपर, मॅगझिन, प्लास्टिक बॅग, कार्डबोर्ड, बॉक्स, फोटो, घरातील वस्तू, खाद्य पदार्थ आणि कपडे जमा करण्याची सवय असते.
लक्षणं -
- जुन्या वस्तू फेकून देणं अशक्य.
- जर इतर व्यक्तीने त्यांच्या वस्तू फेकून देण्याचा प्रयत्न केला तर चिडचिड होते.
- जमा केलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवण्यास त्रास होणं.
- निर्णय घेण्यास असमर्थ असणं.
- जमा केलेल्या वस्तूंमुळे तणावामध्ये असणं
- इतर लोकांवर सतत संशय घेणं की, त्यांनी जमा केलेल्या वस्तू कोणी फेकून तर देणार नाही ना?
- इतरांपासून वेगळं राहणं आणि सतत आजारी राहणं.