(Image Creadit : afmedios.com)
सध्या लोक औषधांपेक्षा अनेक थेरपींचा आधार घेताना दिसतात. त्यामध्ये अनेक थेरपींचा समावेश होतो. पण सध्या अनेकजण फिजियोथेरपीचा आधार घेताना दिसत आहेत. सर्वांना वाटतं की ही एक आधुनिक पद्धत असून औषधांऐवजी याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. भारतात प्राचीन काळापासून सुरू असणाऱ्या व्यायाम आणि मालिश यांसारख्या उपायांशी मिळतं जुळतं रूप म्हणजे फिजियोथेरपी. मानसिक ताण, गुडघेदुखी किंवा पाठ आणि कंबरदुखी यांसारख्या आजारांवर औषधांपेक्षा फिजियोथेरपी फायदेशीर ठरते.
सध्या अनेकजण औषधांऐवजी सर्रास फिजीयोथेरपीचा आधार घेताना दिसतात. कारण या थेरपीसाठी अधिक खर्चही होत नाही आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्सही नाहीत.
काय आहे फिजीयोथेरपी?
प्रशिक्षित फिजीयोथेरपीस्टद्वारे व्यायामामार्फत शरीरातील मांसपेशींना योग्य प्रकारे सक्रीय करण्यासाठी जी क्रिया करण्यात येते त्याला फिजीयोथेरपी म्हटलं जातं. अनेकदा ऑफिसमधील बैठ्या कामामुळे एकाच जागी तासनतास बसून राहावं लागतं. त्याचप्रमाणे काही वेळा व्यायाम करताना किंवा खेळताना स्नायूंना झालेली दुखापत ठिक करण्यासाठी फिजीयोथेरपी घेण्याचा सल्ला स्वतः डॉक्टरही देतात.
हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, केवळ दुखापत झाल्यामुळेच नाही तर निरोगी राहण्यासाठी किंवा थकवा, ताण दूर करण्यासाठीही फिजीयोथेरपीचा आधार घेण्यात येतो. सध्याच्या काळात कमी खर्चात अगदी सहज शक्य असल्यामुळे फिजीयोथेरपी लोकप्रिय होत आहे.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मतानुसार, अस्थमा किंवा फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तींव्यतिरिक्त गर्भवती स्त्रियाही फिजीयोथेरपीचा आधार घेऊ शकतात. देशातील अनेक मोठ्या हॉस्पिटल्समध्ये फिजीओथेरपी करण्यात येते. तसेच वयोवृद्ध व्यक्ती, पेशन्ट यांच्यासाठी त्यांच्या सोईनुसार फिजीयोथेरपी अगदी घरी जाऊनही देण्यात येते.
फिजीयोथेरपीआधी या गोष्टी लक्षात घ्या!
जर तुम्हाला फिजीयोथेरपीचा पूर्णपणे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फिजीयोथेरपीचे सर्व सेशन्स पूर्ण करणं गरजेचं आहे. फिजीयोथेरपी सुरू करण्याआधी तुमच्या फिजीयोथेरपीस्टकडून त्याबद्दल जाणून घ्या. त्यानंतर त्यासाठी किती दिवसांचा अवधी लागेल याची माहिती करून घ्या. तसेच तुम्हाला नेमका काय त्रास होतोय याबाबत फिजीयोथेरपीस्टशी सविस्तर चर्चा करा.