आपल्या रोजच्या आहारात (Diet) अनेक पदार्थांचा समावेश असतो. परंतु, आहारात आरोग्यपूरक पदार्थांचा प्राधान्याने समावेश असावा, असं तज्ज्ञ सांगतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहारात बदल झाला आहे. परिणामी हृदयविकार, मधुमेह सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आहारात सॅलड, पालेभाज्या आणि फळांचा समावेश आवश्यक आहे. कोशिंबीर, चटणी, रायतं असे अनेक पारंपरिक पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असतात. या पदार्थांमध्ये लोणच्याचादेखील समावेश होतो. चटपटीत लोणचं (Pickle) नाश्ता, जेवणाची चव वाढवतं, परंतु, अती लोणचं खाणं हे आरोग्यासाठी (Health) अपायकारक मानलं गेलं आहे. रोज लोणचं खाणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.
लिंबू, कैरी, ओली हळद, मिरची आदींपासून बनवलेलं लोणचं नाश्ता (Breakfast) आणि जेवणात आवर्जून समाविष्ट केलं जातं. काही लोक नाश्तामध्ये स्टफ्ड पराठे, लोणी आणि लोणचं आवर्जून खातात. अगदी रोज लोणच्याशिवाय न जेवणारे लोकही आपल्या आसपास आहेत. परंतु, रोज लोणचं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. परंतु, तुम्हाला लोणचं खूपच आवडत असेल आणि तुम्हाला कोणताही आजार नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा लोणचं खाऊ शकता. मात्र जर तुम्हाला आजार असतील तर लोणचं खाणं टाळावं. लोणचं खाण्याची तीव्र इच्छा असेल तर अगदी थोडं लोणचं खाण्यास हरकत नाही.
लोणचं दीर्घकाळ टिकावं, यासाठी त्यात मिठाचा (Salt) जास्त प्रमाणात वापर केला जातो. मिठात सोडियम (Sodium) असतं. सर्वसामान्य लोक घरात रिफाइंड मिठाचा वापर करतात. या मिठात 97 ते 99 टक्के सोडियम क्लोराइड असतं. हे सोडियम क्लोराइड आरोग्यासाठी घातक असतं. `डब्ल्यूएचओ`च्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीनं दिवसभरात पाच ग्रॅमपेक्षा कमी म्हणजेच सुमारे केवळ एक चमचा मीठाचं सेवन करणं गरजेचं आहे. एक चमचा मिठातून शरीराची सोडियमची गरज भरून निघते. परंतु, जेवणातील अनेक पदार्थांच्या माध्यमातून जास्त प्रमाणात मीठ खाल्लं जातं. त्यामुळे शरीरात अतिरिक्त सोडियम जातं. त्यातच पुन्हा लोणचं खाल्ल्यानं प्रमाणापेक्षा कित्येकपट जास्त मीठ शरीरात जातं. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते,`` असं डिएटिशियन अनामिका सिंग यांनी सांगितलं.
तज्ज्ञांच्या मते, सोडियमची कमतरता आणि अधिक प्रमाणात सोडियममुळे शारीरिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे शरीरात संतुलित प्रमाणात सोडियम जाईल, याकडं लक्ष देणं आवश्यक आहे.
पुरुषांनी रोज लोणचं खाऊ नये. कारण लोणच्यात मीठ जास्त असतं. त्यामुळे सेक्शुअल डिझायर (Sexual Desire) आणि शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे वंध्यत्वाची (Infertility) समस्या वाढू शकते. त्यामुळे पुरुषांनी कमी प्रमाणात लोणचं खाणं आवश्यक आहे.
जेवणात जास्त प्रमाणात सोडियम असेल तर हृदयविकार (Heart Disease) होण्याची शक्यता बळावते, असं अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झालं आहे. सोडियममुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित त्रास नाही, अशांनी जास्त प्रमाणात सोडियमचं सेवन केलं तर त्यांना हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात मीठ खाणं अकाली मृत्यूचं कारण ठरू शकतं, असं अनेक अभ्यासांमधून दिसून आलं आहे.
गर्भधारणेच्या काळात (Pregnancy) महिलांना लोणचं खाण्याची इच्छा होते. शरीरात हॉर्मोनल बदल झाल्यानं अशी इच्छा निर्माण होत असते. लोणचं खाल्ल्यानं महिलांच्या तोंडाची चव सुधारते. तसंच त्यांच्या शरीराला सोडियम आणि पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट मिळतात. हे इलेक्ट्रोलाइट भ्रुणाच्या विकासासाठी आवश्यक असतात. परंतु, जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्यास महिलांमध्ये ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी कमी प्रमाणात लोणचं खावं, असं तज्ज्ञ सांगतात.
लोणचं तयार करण्यासाठी तिखट, मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे तोंडाला चव येते. परंतु, जास्त प्रमाणात मीठ आणि मसाल्याचा वापर केलेला असल्यानं अल्सरचा धोका वाढतो. याशिवाय मीठ शरीरात साठून राहतं. त्यामुळे अंगावर सूज येऊ शकते. प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्यानं किडनी (Kidney) आणि लिव्हर (Liver) खराब होऊ शकतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानं ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे अन्य अवयवांवर दाब वाढतो. अशा स्थितीत लिव्हर आणि किडनीचं नुकसान होऊ शकतं. ज्या लोकांना लिव्हर किंवा किडनीच्या समस्या आहे, त्यांनी लोणचं जास्त खाऊ नये.
एकूणच लोणच्यामुळे तोंडाला चव येते, हे जरी खरं असलं तरी जास्त प्रमाणात आणि रोज लोणचं खाणं आरोग्यासाठी हितावह नाही. यामुळे हृदयविकार, लिव्हर आणि किडनी विकार, उच्च रक्तदाब होऊ शकतो.