कोणत्याही सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांत आधी त्याचा मेंदू काम करणे थांबवतो, या आतापर्यंतच्या वैद्यकीय धारणेला छेद देणारे संशोधन अमेरिकेतील येल विद्यापीठात करण्यात आले. मृत डुकरांचे मेंदू तब्बल चार तासांनंतर पुन्हा कार्यरत करण्यात येथील शास्त्रज्ञांच्या चमूला यश आले आहे. त्यामुळे मेंदूतील एकामागोमाग एक घटक निकामी होत गेल्याने बळावणाऱ्या अल्झायमरसारख्या आजारावर उतारा शोधणाऱ्या संशोधनाला गती मिळणार आहे. त्याच वेळी मृत मेंदूचे पुनरुज्जीवन करता येत नाही, असे मानून अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रक्रियेचाही पुनर्विचार करावा लागणार आहे.
'नेचर' नावाच्या संशोधन पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रा. नेनाद सेस्टन आणि चमूने कत्तालखान्यातून बत्तीस डुकरांचे मेंदू मिळविले आणि ते मृत्यूनंतर चार तासांनी कृत्रिम रक्त, प्राणवायू आणि अन्य औषधांपासून बनविलेल्या विशिष्ट द्रवामध्ये ठेवले. तसेच त्याला सातत्याने योग्य प्रमाणात झटकेही देण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान मेंदूतील पेशींच्या झपाट्याने मृत होण्याला अटकाव करता आला. तसेच काही रक्तवाहिन्या आणि मेंदूच्या काही क्रियांचे पुनरुज्जीवनही करता आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत वापरण्यात आलेले मृत मेंदूही जिवंत मेंदूंइतकेच प्राणवायू वापरत होते. शिरच्छेदानंतर तब्बल १० दहांपर्यंत ही स्थिती होती. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मेंदूचे सजग असण्याचे किंवा तत्परतेने प्रतिसाद देण्याचे मुख्य कार्य मात्र पूर्ववत सुरू करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. त्यामुळे हे संशोधन सध्या बाल्यावस्थेत आहे. पण यामुळे मेंदूसंदर्भातील संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे.
प्रा. नेनाद यांच्या म्हणण्यानुसार, 'आतापर्यंत आपली समजूत होती की, मृत्यूनंतर काही वेळात मेंदूतील पेशी आणि पर्यायाने मेंदूही मृत होतो. पण आम्ही या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, मेंदूतील पेशी आणि विविध घटक टप्प्याटप्प्याने मृत होतात आणि योग्य प्रयत्न केल्यास हे त्यांचे मृत होणे काही काळ रोखून धरता येते; इतकेच नव्हे, तर काही पेशी पुनरुज्जीवितही करता येतात.'