नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनबाबत (Omicron Variant) जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या अतिरिक्त आणि बूस्टर डोसबाबत 15 दिवसांत सर्वसमावेशक धोरण येऊ शकते, असे देशातील कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोरा (Dr. NK Arora) यांनी म्हटले आहे. तसेच, लसीकरणाबाबत नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप बूस्टर आणि अतिरिक्त डोसवर सर्वसमावेशक धोरण तयार करत आहे. या धोरणांतर्गत कोणाला अतिरिक्त लसीची गरज आहे, हे ठरवले जाईल, असेही डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मीडियामध्ये असे वृत्त आले होते की, तिसरा लसीचा डोस सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केला जाईल. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांना अतिरिक्त डोस दिले जातीत, तर बूस्टर डोस हे लसीच्या दुसऱ्या डोसच्या काही महिन्यांनंतर निरोगी लोकांना दिले जातील.
ज्या लोकांची कोणत्याही रोगामुळे प्रतिकारशक्ती कमी आहे, ते सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे संरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे. निरोगी लोकांसाठी बूस्टर डोसची सुरुवात नंतर केली जाऊ शकते. गेल्या ऑक्टोबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका समितीने कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अतिरिक्त डोसची शिफारस केली होती.
काय म्हणाले होते केंद्रीय आरोग्यमंत्री?केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच सांगितले होते की, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य आहे. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार बुस्टर डोसबाबत निर्णय घेतला जाईल, असे मनसुख मांडविया म्हणाले होते. सरकार अशा प्रकरणात थेट निर्णय घेऊ शकत नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि तज्ज्ञांची टीम जेव्हा बूस्टर डोस द्यावी देण्याबाबत सांगेल, त्यावेळी आम्ही त्यावर विचार करू, असेही मनसुख मांडविया यांनी सांगितले होते.
ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत संशोधन सुरूजगात कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने खळबळ उडवून दिली आहे. याबाबत पाश्चात्य देशांमध्ये आता संशोधन सुरू झाले आहे. अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले की, ओमायक्रॉन व्हेरिएंट किती संसर्गजन्य आहे, ते किती गंभीर आहे आणि त्यात इतर कोणती वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेण्यासाठी दोन आठवडे लागतील. याबाबत संशोधन सुरू आहे.