मिली मजुमदार
आपल्या पृथ्वीवर आणि लोकांवर कोविड-१९चे दूरगामी परिणाम झाले आहेत. ही खोल जखम आहे. ती हळुहळूच भरून येणार असली तरी त्याचा कायमस्वरुपी व्रण मात्र राहील. या काळात आपण बरंच काही शिकलो... स्रोतांचे संवर्धन करण्याचे महत्त्व आपण शिकलो, आयसोलेशनमध्ये राहूनही व्हर्च्युअली इतरांच्या संपर्कात राहण्यास आपण शिकलो, शेअरिंग, काळजी घेणं, सहानुभूती शिकलो. समाजातील प्रत्येक घटकाचे हित आणि आरोग्याची खातरजमा करणारा संवेदनक्षम, शाश्वत आणि समानतेवर आधारित समाज उभारण्याची गरज आणि त्यातील ताकद कधी नव्हे इतकी आपल्याला उमगली.
या मूळ तत्वांच्या पायावर उभ्या असलेल्या हरित आणि शाश्वत समुदाय व इमारतींना ही परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली. त्यामुळेच, आपल्या समोर आलेल्या या आव्हानांच्या संदर्भात सजग असण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच नियोजन आणि डिझाइन प्रक्रिया, संकल्पना आणि धोरणांच्या अमलबजावणीत काही बदल करण्याची, तडजोडी करण्याचीही गरज आहे. आपण आता पुन्हा एकदा दैनंदिन व्यवहार सुरू करत आहोत. अशावेळी आपल्या कामाच्या जागा आणि घरांमध्ये 'न्यू नॉर्मल'चा अवलंब व्हायला हवा. शिवाय, भविष्यातील कामाच्या जागांचा, घरांचा नव्याने विचार व्हायला हवा. या जागा बदल करता येतील अशा आणि या प्रकारच्या आव्हानात्मक वेळेतही बदल अंगिकारतील अशा असायला हव्यात.
हेल्थकेअर, अन्न, निवारा, दळणवळण, अशा अत्यावश्यक साधनांचा समान पुरवठा करण्यातही अलिकडच्या काळात आपली शहरे आणि समुदायांना प्रचंड अडचण जाणवली. बहुविध वापर आणि सेवा देणाऱ्या किंवा दळणवळण साधनांशी जोडलेले विकास प्रकल्प आणि वैश्विक स्तरावर जोडले जाणारे, चालण्याच्या अंतरावरील, सुटसुटीत, मानवी गरजांच्या आधारवर बेतलेली निवासस्थाने असण्यातील फायदे आपल्याला कळले. अशा हरित समुदायांमध्ये आरामदायी, सुरक्षित, कोणत्याही अडथळ्यांविना जगता येते, काम करता येते आणि वय, क्षमता आणि इतर मुद्द्यांचा परिणाम न होता प्रत्येकालाच या सुविधा उपलब्ध असतात, वापरता येतात. महत्त्वाच्या सोयीसुविधांच्या समान उपलब्धतेची गरज कधी नव्हे इतकी जाणवली. त्यामुळे आपली शहरे आणि समुदायांच्या गरजांचा आढावा घेणे आवश्यक आहे आणि या सेवा सर्वांनाच, विशेषत: वंचित आणि गरिबांमध्येही समान पद्धतीने उपलब्ध करून द्यायला हव्यात. भारतीय शहरांची संकटाप्रति असलेली सज्जता आणि कोविडला दिलेला प्रतिसाद यातून हे स्पष्ट झाले की, ज्या शहरांमध्ये, समुदायांमध्ये सर्वांसाठी सुयोग्य नियोजन, सज्जता आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होत्या तिथे या आजाराचा प्रसार अधिक परिणामकारकरित्या रोखला गेला.
सोशल डिस्टंसिंग हा एक नवा नियम आहे. कोणताही गोंधळ, अंदाधुंद निर्माण न करता या नियमांचे पालन केले जाण्यासाठी मोकळ्या जागा निर्माण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणे किंवा खासगी आणि निमखासगी जागांसाठी हे लागू होते.
मोकळ्या आणि सर्वांना उपलब्ध हिरव्यागार भागांमुळे लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आणि एकूण स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. इमारतींपासून चालत जाण्याच्या अंतरावर सर्वांना उपलब्ध असतील, अशा हरित जागा तयार केल्याने चालण्याला प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून सार्वजनिक आयोग्य आणि जगण्याचा दर्जा वृद्धिंगत होईल. निवासी आणि व्यावसायिक जागांमध्येही सोशल डिस्टंसिंग आणि संपर्करहित सेवा शक्य व्हाव्यात, अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे.
घरांमध्येही आता काही बदल अंगिकारावे लागणार आहेत - आजारी व्यक्तीचे आयसोलेशन, घरून काम करण्याची तजवीज, मुले, महिला आणि ज्येष्ठांना सुरक्षा आणि सुरक्षितता देणे आणि संकट नसताना घरातील व्यवहार सुयोग्यरितीने सुरू राहावेत यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुरेशी खेळती हवा, सूर्यप्रकाश आणि लवचिक, उपयुक्त जागा, अशा हरित रचनेतील वैशिष्ट्यांमुळे अधिक उपयुक्तता आणि परिणामकारकता लाभते आणि त्यातून साहजिकच शरीराला आरामदायीपणा आणि अधिक चांगले मानसिक आरोग्य मिळते.
लिफ्ट लॉबीज, सार्वजनिक ठिकाणे अशा सर्वांच्या वापराच्या जागांमध्ये सोशल डिस्टंसिंग, निर्जंतुकीकरणाची सोय आणि इतर सुरक्षा उपाययोजना असायला हव्यात. व्यावसायिक रिटेल, कार्यालयांमध्ये विविध ठिकाणांहून येणाऱ्या लोकांना सामावून घेण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांना सुरक्षित, निर्जंतूक वातावरण पुरवून कामासाठी आरोग्यदायी वातावरण पुरवावे लागणार आहे.
कार्यालयांमध्ये आरोग्यदायी वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हरित स्वच्छतेतील सर्वोत्कृष्ट पद्धती अवलंबणे आणि तशी धोरणे आखणे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर सेवा आता आवश्यक झाल्या आहेत.
सर्व कार्यालयांमध्ये त्या जागा व्यापल्या जात असताना इमारतींची देखभाल आणि मानवी वर्तन यात शाश्वत पद्धती राबवण्याची गरज आहे. आतल्या बाजूला हवेचा दर्जा राखणे आणि विषाणूंचा प्रसार होऊ नये, अशा प्रकारे कंडिशनिंग सिस्टम असणे, हीसुद्धा प्राथमिक गरज आहे. एएसएचआरएई (अमेरिकन सोसायटी फॉर हिटिंग, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग) आणि भारतातील त्यांची संस्था आयएसएचआरएई यांनी या जागांमध्ये पुन्हा कामकाज सुरू करताना तापमान किती असावे, आर्द्रतेची मर्यादा, हवेच्या वितरणाच्या पद्धती, यूव्ही किरणांच्या माध्यमातून हवेचे निर्जंतुकीकरण तसेच हवेचे शुद्धीकरण यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण असावे, यासाठी या सर्व उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे.
आणखी एक काळजीचा मुद्दा म्हणजे पाणी. सर्व कार्यालये आणि व्यावसायिक जागा लॉकडाऊनमुळे अचानक बंद झाल्या. त्यामुळे तिथे असलेले पाणी तसेच पडून राहिले असण्याची आणि इतक्या महिन्यांनंतर ते दूषित झाले असल्याची प्रचंड शक्यता आहे. त्यामुळे, पाण्याच्या दर्जाची खातरजमा करून घेणे आणि त्या यंत्रणेला नव्याने सुरू करणे गरजेचे आहे.
आपण आता कार्यालये हळुहळू सुरू करत आहोत आणि आयुष्य पूर्ववत जगण्यास प्रारंभ करत आहोत. पण, या विषाणूचे भय कायम आहे आणि भविष्यात असे संकट येईल ही भीतीसुद्धा. म्हणूनच, या संकटातून योग्य तो धडा घेऊन भविष्य अधिक आरोग्यदारी आणि सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.
(लेखिका ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट, इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि यूएसजीबीसीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत)