प्रौढांमध्ये चव आणि वास कमी होणे ही कोरोनाची सामान्य लक्षणे (Corona symptom) आहेत. परंतु, जर तुमचे मूल खाण्या-पिण्यात नाखूष असेल तर त्यालाही कोरोनाची लक्षणे असण्याची शक्यता असते. ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर खाण्यापिण्याबाबत चिडचिड करणाऱ्या मुलांमध्ये पोस्ट-कोविड लक्षणे (Post Covid symptom) असू शकतात.
युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया आणि फिफ्थ सेन्स नावाच्या धर्मादाय संस्थेने हे संशोधन केले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या पॅरोसमिया विकारावर चर्चा केली. पॅरोसमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लोकांना अन्नपदार्थांपासून दुर्गंधी-घाण वास येतो. हा वास कुजलेली अंडी, मांस आणि रसायनांसारखा असतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा विकार अनेक लोकांमध्ये कोरोनामधून बरे झाल्यानंतर आणि नंतरही अनेक दिवस कायम राहतो.
संशोधनात असे आढळून आले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये मुलांना कोरोना नंतर पॅरोसमिया विकार देखील होऊ शकतो. यामुळेच कोविडमधून बरे झाल्यानंतर मुले खाण्या-पिण्यास आडे-वेडे घेतात.
किशोरवयीन मुलांना भेडसावणाऱ्या समस्याबीबीसीशी केलेल्या संभाषणात, विद्यापीठाचे प्राध्यापक फिलपॉट म्हणाले की, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच किशोरवयीन मुलांमध्ये पॅरोसमिया विकार दिसून येत आहे. ते म्हणतात, "वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ञांना अद्याप ही समस्या ओळखता आलेली नाही. मुलांची ही बाब समजून न घेता, आपण म्हणत राहतो की मुलं नीट काही खात नाहीत.
फिलपॉट म्हणतात की, जी मूलं आधीच काही नीट खात नाहीत किंवा ज्यांना ऑटिझम विकार आहे, त्यांच्यासाठी कोविड नंतरच्या या लक्षणातून जाणं अधिक कठीण आहे.
फिफ्थ सेन्स चॅरिटीचे डंकन बोक सांगतात की, त्यांना अशी अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. ज्यात कोरोना विषाणूनंतर मुलांचे खाणेपिणे बदलले आहे. "आम्ही काही पालकांकडून ऐकले आहे की, त्यांची मुले पोषणासंबधी समस्यांमुळे त्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांचे वजन कमी झाले आहे. परंतु, डॉक्टरांनी ती मुलांची एक वाईट सवय म्हणून सोडून दिल्याचे," त्यांनी बीबीसीला सांगितले.
नेचर जेनेटिक्स या जर्नलमध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात शास्त्रज्ञांना आढळून आले की, मुलांमध्ये पॅरोसमिया विकाराची प्रकरणे वाढत आहेत. संशोधनात याचे कारण कोरोनामुळे उद्भवणाऱ्या समस्या असल्याचे मानले जात होते. संशोधकांनी अशीही माहिती दिली होती की, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये पॅरोसमियाचा विकार जास्त दिसून येतो. तसेच ज्या लोकांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर ही लक्षणे दिसतात, त्यांचे वय कमी आहे.
पॅरोसमियाने ग्रस्त असलेल्या मुलांना काय खायला द्यावे?डंकन बोक म्हणतात की पालकांनी अन्नाची यादी तयार करावी. यामध्ये त्यांच्या मुलाला कोणता आहार आवडतो आणि कोणता नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. याशिवाय मुलांना उग्र वासाचे पदार्थ देऊ नयेत. त्यांना साधं अन्न खाण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. यामुळे त्यांना वास आणि चवीची समस्या फारशी त्रासदायक होणार नाही आणि ते सहज अन्न खाऊ शकतील.
बोक म्हणतात की, तुम्ही जेवताना बाळाचे नाक बंद करण्यासाठी नाकाची क्लिप देखील वापरू शकता. पॅरोसमिया विकारातून लवकर बरे होण्यासाठी तुम्ही मुलांना 'स्मेल ट्रेनिंग' देखील देऊ शकता. यामध्ये मुलांना दिवसातून दोनदा चार वेगवेगळ्या वास हुंगवावा लागतो.