लंडन- गेल्या काही वर्षांमध्ये बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी यामुळे हृदयरोग, रक्तदाबात होणारे चढ-उतार आणि मधुमेह हे रोग शहरी जीवनात मोठ्या प्रमाणात पसरलेले दिसून येतात. आता शहरांबरोबर ते ग्रामिण भागातही पोहोचल्याचे दिसून येतात. हृदयरोगाबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध होत असतात. मात्र यावर्षी झालेल्या नव्या संशोधनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वयाची चाळीशी येण्यापुर्वी आलेलं टक्कल आणि पांढरे होणारे केस हे लठ्ठपणापेक्षा हृदयरोगाचे लक्षण असू शकते असे एका नव्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. भारतातील 200 हजार तरुणांची माहिती गोळा केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. टक्कल पडलेले आणि पांढरे केस असणाऱ्या तरुणांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता यावेळेस जास्त दिसून आली. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतातीय कार्डिओलॉजी सोसायटीच्या वार्षिक परिषदेत या संशोधनपत्रिकेचे वाचन होणार आहे.या अभ्यासात कोरोनरी आर्टरी डिसिज असणाऱ्या 790 आणि उत्तम आरोग्य असणाऱ्या 1270 लोकांचा विचार करण्यात आला होता. या 1270 लोकांच्या गटाचा उपयोग कंट्रोल ग्रुप म्हणून करण्यात आला. त्यांच्या आतापर्यंतच्या आरोग्याची माहितीही विचारात घेण्यात आली होती. या सहभागींच्या टक्कल पडण्याच्या व केस पांढऱ्या होण्याच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर मिळालेले निष्कर्ष हृदयरोगाशी त्यांचा संबंध असल्याचे सूचित करत होते.
कंट्रोल ग्रुपपेक्षा 790 लोकांच्या गटातील लोकांना अकाली टक्कल किंवा केस पांढरे होण्याची समस्या 5 पटीने जास्त असल्याचे या अभ्यासात दिसून आले. तसेच हृदयरोग होण्याची शक्यताही कंट्रोल ग्रुपपेक्षा 5.6 पटीने अधिक असल्याचे निरीक्षणांमध्ये दिसून आले.