डॉ. राजीवा रंजन, कन्सल्टंट फिजिशिअन
जर तुमच्या आसपास कोणी ट्युबरक्युलॉसिस (टीबी) झालेला रुग्ण असेल किंवा तुम्हाला अलीकडील काळात खोकला, ताप, रात्री घाम येणे, भूक न लागणे वा अतिशय थकवा जाणवत असेल तर तुम्हाला टीबी झालेला असण्याची शक्यता आहे. तसेच सध्या कोरोना विषाणूची साथ आहे आणि दोन्ही आजारांची लक्षणे सारखी आहेत, त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे सर्वांत चांगले. त्वरित तुमच्या डॉक्टरांना दाखवा. विशिष्ट त्वचा किंवा/आणि रक्ताच्या चाचण्या टीबीच्या निदानासाठी केल्या जातात, त्यात टीबीचे निदान झाले तर त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक असते. टीबीचे निदानच झाले नाही किंवा त्यावर उपचार झाले नाहीत, तर तुमची प्रकृती खालावत जाते आणि त्याचबरोबर या विकाराचे संक्रमण तुमच्या आजुबाजूच्या लोकांना तसेच एकंदर समुदायात होण्याची शक्यता वाढते.
तुम्हाला टीबीचे निदान झाले, विशेषत: कोरोनाची साथ असताना टीबीचे निदान झाले, तर तुम्ही काय करू शकता हे खाली दिले आहे:
निक्षय संपर्क
टीबीची लक्षणे, निदान, चाचण्या, उपचारांचे पर्याय, औषधे आणि अन्य बाबींबाबत तुम्हाला काही शंका असतील, तर ही हेल्पलाइन आहे. ही हेल्पलाइन रुग्णांना माहिती व मदत करण्यासाठी १४ भाषांमध्ये काम करते: १८००-११-६६६६
नियमित औषधे
एकदा उपचार सुरू झाले की, औषधे नियमितपणे घेतली जातील याची काळजी घ्या. औषधे अजिबात चुकवू नका. औषधे आणि ती घेण्याचा कालावधी प्रादुर्भावाचे ठिकाण, तुमचे वय, औषधाला असलेला संभाव्य प्रतिरोध आणि सुप्त किंवा सक्रिय टीबीसारखे टीबीचे प्रकार यांवर अवलंबून असतो.
ट्रॅकिंग
सध्याच्या साथीच्या काळात डॉट (डायरेक्टली ऑब्झर्व्ह्ड थेरपी- यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दररोज भेटता) शक्य होत नसली, तरी दररोज काहीतरी अॅक्टिव्हिटी करा आणि औषधे या अॅक्टिव्हिटीच्या आधी किंवा नंतर घ्या. या मार्गाने तुम्ही एक दिनक्रम कायम राखू शकता. तुम्ही मित्रमंडळी/कुटुंबीय यांनाही तुम्हाला आठवण करून देण्यास सांगू शकता.
कॅलेंडर
तुमची औषधे दररोज ठरलेल्या वेळी घ्या आणि औषधे घेतल्यानंतर कॅलेंडरवर तशी खूण करून टाका. एका दिवसाची औषधे चुकली तरी डॉक्टरांशी संपर्क साधा.
वैयक्तिक स्वच्छता
नेहमी सोबत टिश्यू पेपर बाळगा आणि खोकला अथवा शिंक आल्यास तो नाकासमोर धरा. एकदा वापरल्यानंतर टिश्यूपेपर फेकून द्या. तुमच्या खोलीत ताजी हवा राहील याची काळजी घ्या. टीबीचे जीवाणू बंदिस्त जागेत वाढतात. हे टाळण्यासाठी मोकळ्या हवेत राहा.
प्रतिबंध:
काही काळ कोणाशीही निकट संपर्क टाळा. तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच कुटुंबियांसोबत मिसळा. टीबी आणि कोरोनाविषाणू हे दोन्ही संसर्गजन्य आजार आहेत. त्यामुळे दोहोंकडे सामाजिक कलंकासारखे बघितले जाते आणि हे आजार असलेल्यांना भेदाची वागणूक दिली जाते. त्यामुळे टीबी/कोव्हिड-१९ यांबाबतच्या प्रेरक कथा सांगण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक, केअरगिव्हर्स, रुग्णांचे कुटंबीय आणि मित्रमंडळी आदींनी पुढे यावे. टीबी झालेल्या रुग्णांबाबत पूर्वग्रह बाळगू नका किंवा त्यांना आजार झाल्यामुळे एका साच्यात बसवू नका.
अशी वागणूक मिळाल्यास ते प्रतिबंधात्मक उपाय करणार नाहीत, आरोग्यपूर्ण सवयी लावून घेणार नाही आणि परिस्थिती आणखी वाईट होईल. लवकर तपासणी, निदान व उपचार यांबद्दल सकारात्मक बोला. तुम्ही टीबीतून बाहेर आला असाल, तर तुमचा अनुभव सर्वांना सांगा. ते उपयुक्त ठरते! लक्षात ठेवा, काही आठवडे उपचार घेतल्यानंतर तुमच्यापासून कोणालाही संसर्ग होण्याची शक्यता उरत नाही. तुम्हाला केवळ डॉक्टर सांगतील तेवढा काळ औषधे घेत राहण्याची आवश्यकता असते. तेव्हा टीबीला घाबरू नका. हा आजार पूर्णपणे बरा होण्याजोगा आहे. CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं.....