नवी दिल्ली : कार्यालयांमध्ये अनेक तास एकाच जागेवर बसून तुम्ही काम करत असाल, तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, ८ ते १० तास बैठे काम करणाऱ्या नोकरदारांमध्ये केवळ शारीरिकच नव्हे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले.
एकाच जागेवर बसून काम करणाऱ्यांना पाठदुखी, डोळेविकार, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. आता मात्र नोकरदारांमध्ये अल्झायमरसारख्या मनोविकारांची समस्या वाढत आहे.
शारीरिक हालचाल आहे महत्त्वाची
संशोधनानुसार, ८ ते १० तास सलग बसून काम केल्यास, शारीरिक हालचाल नसल्यास मेंदूला रक्तपुरवठा होत नाही.
कित्येक तास लॅपटॉपवर काम करणे, टीव्ही पाहणे, वाहन चालवणे आदींमुळेही हा विकार होण्याचा धोका संभवतो.
मेंदूच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊन आजार बळावण्याची शक्यता असते.
परिणामी, बैठे काम करत असल्यास ठराविक वेळाने हालचाल करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
काय आहे अल्झायमर?
अल्झायमर हा न्यूरोलॉजिकल आजार असून, त्यात मेंदूच्या पेशी कमी होतात. मेंदू त्याचे काम स्वतःहून करू शकत नाही.
विशेषतः एखादा विषय समजून घेणे, गोष्टी लक्षात ठेवणे, विविध गोष्टींतून अचूक निवड करणे, यासारखी कामे करण्यात त्रास होतो. विशेषतः वर्षानुवर्षे करत असलेली कामे उदा. अन्न चावणे, कपडे घालणे, पैसे मोजणे आदी गोष्टी विसरायला होतात.
आजार होण्याची अन्य कारणे काय?
वाढते वय : हा आजार प्रामुख्याने वृद्धापकाळातील आहे. वाढत्या वयासोबत अल्झायमरचा धोका वाढतो. वयाच्या ६५ वर्षांनंतर या आजाराचा धोका दुप्पट होतो.
लिंग : कारण पुरुषांपेक्षा महिला अधिक काळ जगतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या आजाराची शक्यता अधिक असते.
कौटुंबिक पार्श्वभूमी : तुमच्या कुटुंबात पूर्वी कुणाला हा आजार असेल, तर तुम्हालाही तो होण्याची दाट शक्यता असते.