-नितांत महाजन
यो यो डाएट नावाचं काही डाएट असतं हे आपल्याला माहित असण्याचं एरव्ही काय कारण होतं, पण अलिकडे चर्चा होती की राणी मुखर्जी यो यो डाएटवर होती, तिचं वजन कमी झालं होतं, आता वाढलं. अर्थात अशा गॉसिपला फार महत्व देवू नये, पण हे यो यो डाएट मात्र जगभर गंभीर विषय आहे. आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी ऑनलाइनही बरीच चर्चा होताना दिसते.तर यो यो डाएट म्हणजे काय? केली. डी. ब्राऊनेल या येल विद्यापीठातील डॉक्टरने ही संकल्पना मांडली. म्हणजे असं डाएट की, सुरुवातीला खूप कडक डाएट करायचं. अन्नत्यागच करायचा. क्रॅश डाएट. इतकं की खाणं बंद. त्यातून झरझर वजन कमी करायचं. असं वजन सुरुवातीला दणक्यात कमी होतं. पण मानवी शरीराचं एक चक्र असतं. वजनाचंही असतं. ते चक्र आपण तोडतो. एकदम अन्नच नाकारतो. खाण्याचा दुस्वास करतो. शरीर तग धरतं. वजन कमी होतं. पण काही दिवसांनी तेवढं क्रॅश डाएट करणं शक्य नसतं. भूक लागते. अन्न दिसू लागतं. थोडं थोडं म्हणत खाणं सुरु होतं. परिणाम म्हणून वजन वेगानं वाढतं. आणि कमी झालेल्या वजनापेक्षा जास्त वजन वाढतं.वजन असं वेगानं घटलं किंवा वाढलं तर त्याचा परिणाम ह्दयावर होतो. रक्तदाबावर होतो. हार्मोन्सवर होतो. आणि शरीराचं चक्र आपण पार बिघडवून टाकतो.त्यामुळेच अनेक तज्ज्ञ सांगतात की, असं यो यो डाएट करू नका.अनेक तरुण मुली, विशेषतर् मॉडेल्स असं डाएट करतात. खाणं एकदमच बंद करुन टाकतात. त्यानं वजन कमी होतंही पण आपलं पचन कायमचं बिघडतं. आपल्या पचनशक्तीवर परिणाम होवून शरीरात योग्य आवश्यक स्त्राव स्त्रवणं कमी होतं.मूड बदलतो. अनेकदा चिडचिड होते. भूक लागल्यानं अनेकांना डोकेदुखी सतावते. लक्ष लागत नाही. एकाग्रतेवर परिणाम होतो. हे सारं टाळायचं तर आपल्या फिटनेसचा विचार करायला हवा. नुस्तं वजन कमी करुन, क्रॅश डाएट करुन काहीही उपयोग नाही.