पुणे : पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. चला तर माहिती घेऊया या भाज्यांची .
पालेभाज्यातून मिळतात ही जीवनसत्वे : जीवनसत्त्वे व खनिजे तर कमी अधिक प्रमाणात मिळतात. त्यातही विशेष करून कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिनचा समावेश होतो. माठ, मेथी, शेवग्याचा पाला यामध्ये कॅल्शियम आढळते. स्नायूंच्या कार्याकरिता हाडे, दात बळकटीसाठी, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. मेथी, माठ, आळू, कोथिंबीर, लाल माठ अशा अनेक पालेभाज्यांत लोह असते. रक्तक्षय असणाऱ्यांनी हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालेभाज्या अधिक खाणे आवश्यक आहे.
पालक : क' व 'ब' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास ते अधिक लाभदायी असतात. पालकमध्ये सल्फर, सोडियम, पोटेंशियम व अमिनो ऑम्लही असते.
मेथी : शारीरिक शक्ती वाढते. या भाजीत अ' जीवनसत्व, कॅल्शियम, प्रथिने तसेच काबौहायड्रेडचे प्रमाण अधिक असते.मेथीची भाजी ही वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे.मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कंबरेचे दुखणे दूर होते. मात्र आम्लपित्त असणाऱ्यांनी दररोज मेथीचे सेवन टाळावे.
कढीपत्ता : कढीपत्त्यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम असते. ऍसिड आणि कॅरेटिनचेही प्रमाण त्यात आढळत असल्याने केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता उपयॊगी आहे.कोलेस्टेरॉल शर्करा कमी करण्याचा गुण कोथिंबिरीप्रमाणे यातदेखील आहे. भाजीसाठी ओला मसाला बनवताना, कोणतीही चटणी बनवताना कढीपत्याचा भरपूर वापर करावा.
कोथिंबीर :कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जळजळीत पदार्थ खाणा-यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते.कोथिंबिरीची पाने जठराला सशक्त करुन त्याला कार्यप्रवण करतात. जठराची जळजळ कमी करून तेथील अंतःस्त्राव वाढवतात.
अळू :अळूची भाजी शरीरात ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा.