आधुनिक लाइफस्टाईलमुळे अनेकांना जाडेपणाचा त्रास सहन करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांनंतरही अनेकांचं वजन कमी होत नाही. पण डाएटींग आणि एक्सरसाईज करुनही वजन कमी न होण्याचं काय कारण असावं याचा कधी विचार केलाय का? चला जाणून घेऊ उपाय करुनही वजन कमी न होण्याची कारणे...
१) झोपण्याची पद्धत
९ तासांपेक्षा जास्त आणि ५ तासांपेक्षा कमी झोपल्याने वजन वाढतं. या दोन्ही कारणांमुळे शरीरावर वाईट प्रभाव पडतो, ज्याने भूकेला नियंत्रणात ठेवणाऱ्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. त्यामुळे व्यक्तीला जास्त भूक लागते आणि वजन वाढतं.
२) कमी पाणी पिणे
दिवसभरात २ ते ६ ग्लास पाणी प्यायल्याने वजन कमी होतं. पाण्यात कॅलरी नसतात. पण अलिकडे लाइफस्टाइलमुळे लोक पाणी कमी आणि सोडा ड्रिंक, ज्यूस, कॉफी इत्यादींचं सेवन अधिक करतात. या सर्वच ड्रिंकमध्ये शुगरचं प्रमाण अधिक असतं, यानेच वजन वाढतं.
३) जास्त वेळ उपाशी राहणे
अनेकांना हा गैरसमज असतो की, उपाशी राहून ते वजन कमी करु शकतील. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, जास्तवेळ उपाशी राहिल्याने वजन कमी नाही तर अधिक वाढतं. जास्तवेळ उपाशी राहिल्याने मेटाबॉलिज्मची क्षमता कमी होते, ज्यामुळे शरीरात असलेल्या कॅलरी नष्ट होत नाहीत. या कॅलरी वजन वाढण्याचं काम करतात.
४) बाहेरचं खाणे
जर तुम्ही जास्तीत जास्त वेळा बाहेर खात असाल तर तुमचं वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा दुपारचं जेवण जास्तवेळी बाहेरच केलं जातं तेव्हा त्यांचं वजन साधारण २ किलो वाढतं.
५) जास्त बसून राहणे
ऑफिसमधील कामाचं प्रेशर किंवा काही लोक घरी टीव्हीसमोर अनेक तास बसलेले असतात. त्यांची ही सवय त्यांचं वजन कमी होऊ देत नाही. हेल्थ एक्सपर्टनुसार, जास्तवेळ बसून राहिल्याने शरीराची भूकेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते आणि लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात. याने लोकांमध्ये वजन वाढतं. त्यामुळे मधेमधे १० मिनिटांचा ब्रेक घ्या.
६) अल्कोहोल
अल्कोहोल हे वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे. जर तुम्ही दिवसभरात तीनपेक्षा जास्त वेळा अल्कोहोलचं सेवन करत असाल तर तुमचं वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते.
७) तणाव
काही लोकांना स्ट्रेस असल्यावर जास्त भूक लागते. भूक घालवण्यासाठी लोक घाईघाईने जास्त कॅलरी असलेले स्नॅक्सचं सेवन करतात. याने वजन वाढतं.
८) थॉयरॉइड
थॉयरॉइडची समस्या असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. थॉयरॉइडची समस्या असल्यावर वजन वाढण्यासोबतच हार्मोन्स सुद्धा असंतुलित होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना थॉयरॉइडची समस्या अधिक होते.
हेल्थ एक्सपर्टनुसार, काही आजारांमुळेही काही लोकांचं वजन वेगाने वाढतं. जे नियंत्रणात ठेवणं कठीण काम असतं.