मुंबई : कोरोनावरील लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम असताना फ्रंटलाइन वर्कर्स मात्र उत्साही असल्याचे दिसत आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अत्यावश्यक सेवेतील दीड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कोविन ॲपवर आपले नाव नोंदविले. लसीच्या उपलब्धतेनुसार या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यापासून लसीकरण केले जाणार आहे.महापालिकेने १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले. दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या एक लाख २५ हजार कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. मात्र, लसीकरणाला ५० टक्केच आरोग्य कर्मचारी हजेरी लावत आहेत. त्यामुळे पहिला टप्पा पूर्ण होण्यास २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दुसऱ्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांची नोंदणी महापालिकेने सुरू केली आहे. यामध्ये पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस, सफाई कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्यानुसार आतापर्यंत सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. काही दिवसांमध्ये या संख्येत वाढ होईल, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात दररोज २४ हजार जणांना लस -- कोविशील्डचा एक लाख ३९ हजार ५०० लसीचा पहिला साठा १५ जानेवारी मुंबईत आणण्यात आला. सुरुवातील एक लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये आणखी २० हजार कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे.- दुसऱ्या टप्यासाठी आणखी तीन जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर, दोन विशेष रुग्णालये, नऊ सर्वसाधारण रुग्णालये, १४ प्रसुतिगृह आणि ४३ दवाखाने असतील. दुसऱ्या टप्प्यात रोज २४ हजारांना लस दिली जाईल.