नागपूर : कोरोनातून बाहेर पडत नाही तोच ४३ वर्षीय रुग्णाला गंभीर स्वरूपाचा म्युकरमायकोसिस झाला. शस्त्रक्रिया करून वरचा जबडा काढावा लागला. अशा स्थितीत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय त्यांच्या मदतीसाठी धावून आले. अथक परिश्रमाने कृत्रिम जबडा तयार केला. त्याच्या प्रत्यारोपणाची अत्यंत गुतागुंतीची शस्त्रक्रियाही यशस्वी केली. म्युकरमायकोसिसनंतरचे हे पहिलेच जबडा व दंत प्रत्यारोपण ठरले. सध्या रुग्णालयाकडे ७० रुग्ण या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिसच्या ११८ रुग्णांची नोंद झाली असून, यातील ६० रुग्णांवर शस्त्रक्रिया करून कोणाचा खालचा तर कोणाचा वरचा जबडा काढावा लागला. नागपूर एम्समधील १० रुग्णांवरही आम्ही शस्त्रक्रिया केली.
कृत्रिम जबडापांढरकवडा येथील सूरज जयस्वाल याच्या म्युकरमायकोसिसच्या निदानानंतर त्यावर शस्त्रक्रिया करीत वरच्या जबड्याचा काही भाग काढला. टायटॅनियम धातूद्वारे कृत्रिम जबडा तयार केला. यासाठी एका खासगी कंपनीने मदत केली. आता जबड्यात कृत्रिम दात बसविण्याची प्रक्रिया होणार आहे.