आजकाल लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळेच प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलची, काचेची, तांब्याची बाटली वापरतात. काही लोक तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणं अधिक आरोग्यदायी मानतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवून ठेवत असाल आणि त्याचा जास्त वापर करत असाल तर तुमच्या पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात. हेल्थ कोच ल्यूक कॉटिन्हो यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.
ल्यूक कॉटिन्हो यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु ते वापरण्यापूर्वी योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ते वापरताना काही चुका करत असाल तर यामुळे तुमच्या पचनक्रियेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, शरीरात झिंकची कमतरता, पोटदुखी आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
वापरण्याची योग्य पद्धत
- तांब्याचं मोठं भांड, ग्लास किंवा बाटलीत गरम पाणी कधीही साठवू नका. त्यात साधं पिण्याचं पाणी ठेवा.
- लिंबूपाण्यासारख्या सायट्रिक गोष्टी तांब्याच्या भांड्यात ठेवू नका कारण त्याची रिएक्शन होऊ शकते आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
- नारळ पाणी किंवा इतर कोणतेही पेय कधीही साठवू नका. काही काळ साधं पाणी साठवून ठेवू शकता.
अतिवापर टाळा
लोक तांब्याच्या बाटल्या वापरतात आणि दिवसरात्र पाणी पितात. पण असं केल्याने शरीरात तांब्याचे प्रमाण खूप वाढू शकते, ज्यामुळे इतर हानी होऊ शकते आणि ते शरीरासाठी विषारी ठरू शकतं. त्याचा जास्त वापर केल्याने शरीरातील झिंकची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती, केस, त्वचा आणि हार्मोन्स चांगली ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आहे.
किती वापर करणं योग्य आहे?
तांब्याच्या भांड्यात, बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी प्यायल्यानंतर तुमच्या पोटात दुखत नसेल आणि ते तुम्हाला अनुकूल असेल तर तुम्ही एक ग्लास म्हणजे १५० मिली तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर पिऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. पण थोडीशीही अडचण आली तर वापर करणं टाळा.