सध्याची बदलती जीवनशैली, (Lifestyle) मसालेदार पदार्थ, जंक फूड याचं सेवन यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. धावपळीच्या युगात व्यायामाला पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) प्रमाण वाढतं.
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय तुम्ही अनेकदा ऐकले असतील. तुम्हाला माहीत आहे का की कोलेस्ट्रॉलची पातळी फक्त वाढतच नाही, तर सामान्यापेक्षा कमीदेखील असू शकते. होय, काही कारणांमुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी होऊ शकते. मुख्य म्हणजे ती जर 50 च्या खाली गेली तर कॅन्सर (Cancer) किंवा मेंदूतील रक्तस्त्राव म्हणजेच ब्रेन ब्लीडिंग (Brain Bleeding) यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात आणि एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्याची कारणं कोणती आहेत आणि त्यामुळे लोकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, याबद्दल माहिती देणार आहोत.
कमी कोलेस्ट्रॉलमुळे काय होतं?वेब एमडीच्या रिपोर्टनुसार, आपल्या रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी 150 असावी. तर, बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी (LDL) 100 mg/dL असावी. ही सामान्य पातळी मानली जाते. रक्त तपासणीत कोलेस्ट्रॉलची पातळी ओळखता येते. जेव्हा रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी 120 mg/dL च्या खाली येते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची (LDL) पातळी 50 mg/dL च्या खाली पोहोचते तेव्हा कमी कोलेस्ट्रॉलची स्थिती निर्माण होते. या स्थितीला हायपरलिपिडेमिया (Hypolipidemia) किंवा हायपोकोलेस्टेरेरोलेमिया (hypocholesterolaemia) म्हणतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असावी.
कमी कोलेस्ट्रॉलची कारणं काय?कोणताही दुर्मिळ कौटुंबिक विकार, कुपोषण, शरीरात फॅट अब्झॉर्ब न झाल्यास, अॅनिमिया (लाल रक्तपेशींची कमतरता), थायरॉईडची समस्या, यकृतासंबंधीत आजार, हिपॅटायटिस सी संसर्ग, गंभीर आजार किंवा दुखापत या कारणांनी माणसाच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.
कोणते आजार होण्याचा धोका?कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्यापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा तर यामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही. पण काही वेळा जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी अत्यंत कमी होते, तेव्हा चिंता, डिप्रेशन, मेंदूतील रक्तस्राव आणि कॅन्सर यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. गर्भवती महिलांमध्ये या समस्येमुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, जन्माला येण्याऱ्या बाळाचं वजन कमी असणं, अशा समस्या उद्भवू शकतात. खरं तर या समस्या केवळ दुर्मिळ प्रकरणात घडतात. पण तरीही हे टाळण्यासाठी लोकांनी वेळोवेळी रक्त तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असं वैद्यकी तज्ज्ञांचं मत आहे.