बॅडमिंटन प्लेयर सायना नेहवालला गॅस्ट्रोएन्टेरायटिसचा आजार झाला आहे. फुलराणी म्हणजेच सायना आपल्याला झालेल्या या आजाराबाबत इन्स्टाग्राम पोस्ट लिहून याबाबत सांगितले आहे. सायनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. सोमवारपासून माझ्या पोटात वेदना होत होत्या, पण तरिही मी ऑल इंग्लंड स्पर्धेत काही सामने खेळले. पण, आता या वेदना असह्य झाल्यामुळे आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घेत आहे. डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. आशा करते की लवकरच कोर्टवर परतेन.''
सायनाला नेहवालला झालेला हा आजार गॅस्ट्रोएन्टेरायटिस एक पोटाचा आजार आहे. गॅस्ट्रोएन्टेरायटिसमध्ये पोटामध्ये वेदना होऊ लागतात. गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार पचनतंत्रामध्ये संक्रमण आणि सूज आल्यामुळे होणारा आजार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखत असूनही ती ऑल इंग्लंड स्पर्धा खेळली, पण तिचे हे दुखणे वाढले आहे आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुखण्यामुळे तिला आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार काय आहे?
गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार मुख्यतः संक्रमणामुळे होणारा आजार आहे. गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या आजारामध्ये व्यक्ती डायरिया आणि अतिसाराचा शिकारही होऊ शकतो. गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या आजाराला स्टमक फ्लू या नावानेही ओळखलं जातं.
गॅस्ट्रोएन्टेरायटिस हा आजार नोरोवायरस, रोटावायरस, एस्ट्रोवायरस यांसारख्या कारणांमुळे होतो. गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार नेहमी दुषित पदार्थ किंवा पाणी प्यायल्याने होतो. खाण्यापिण्याच्या पदार्थांमधून याचे वायरस पोटामध्ये जातात आणि शरीरामध्ये पसरतात. मुलं आणि वयोवृद्धांमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो.
गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजाराची मुख्य लक्षणं :
गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजारामध्ये पोटात दुखणं, अचानक थंडी वाजणं, उलट्या होणं. त्वचेवर जळजळ होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. काही लोकांना तापासोबतच खूप घामही येतो. गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजार अतिसार, सांधेदुखी आणि स्नायूंना वेदना होणं यांसारख्या समस्या दिसून येतात.
रोटावायरस, एस्ट्रोवायरस आणि बॅक्टेरिया यांमुळे पसरणाऱ्या संक्रमणामुळे हा आजार अत्यंत घातक ठरतो. गॅस्ट्रोएन्टेरायटिस आजारवर त्वरित उपचार करणं अत्यंत आवश्यक असतं. जर दुर्लक्षं केलं तर पोटाच्या इतर गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
गॅस्ट्रोएन्टेरायटिसचा धोका
अधिक गरमी आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो. हे वातावरण आजारांचे जीवाणू पसरण्यासाठी अनुकूल असते. या वातावरणामध्ये कापलेली फळं, भाज्या आणि अन्य पदार्थ लवकर खराब होतात.
माशा, डास हे अशा आजारांचे जीवाणू एका खाद्यपदार्थांपासून दुसऱ्या खाद्यपदार्थांपर्यंत घेऊन जातात. परिणामी या पदार्थांचं सेवन केल्याने जीवाणू शरीरामध्ये प्रवेश करतात आणि ती व्यक्ती आजारी पडते. दूषित पाणीही हा आजार पसरण्याचं मुख्य कारण आहे.