जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकारामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. परिस्थितीला तोंड देण्यासाठी जागोजागी पुन्हा निर्बंध लावण्यास सुरूवात झाली आहे. अशात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या उपचाराबाबत शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश आलं आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका टीमने शरिरातील अशा अँटीबॉडीजचा शोध लावला आहे, ज्या ओमिक्रॉनसह कोरोनाचे सर्व प्रकार निष्प्रभ करू शकतात. या अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या त्या भागांना लक्ष्य करतात, ज्यामध्ये उत्परिवर्तन होत असतानाही कोणताही बदल होत नाही.
युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे असोसिएट प्रोफेसर डेव्हिड वेइसलर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) टोकदार भागाला स्पाइक प्रोटीन म्हणतात. याद्वारे ते मानवी पेशींमध्ये प्रवेश करून संसर्ग पसरवतात. कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनच्या विशिष्ट भागाला लक्ष्य करणार्या अँटीबॉडीजच्या विकासावर लक्ष केंद्रित करून ही महामारी नियंत्रित केली जाऊ शकते, असं प्रोफेसर डेव्हिड वेइसलर यांनी म्हटलं आहे.
बूस्टर डोस (Booster Dose) घेणं हे शरीरातील अँटी-बॉडीज वाढवण्यासाठी एक चांगला निर्णय असू शकतो, असं प्रोफेसर वेसलर यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccine) घेतलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीजच्या संख्या कमी असू शकते. पण बूस्टर डोस आणि दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीज अधिक प्रमाणात विकसित होत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे असं प्रोफेसर वेसलर यांनी सांगितलं. म्हणजेच बूस्टर डोस घेतल्याने अँटीबॉडी मजबूत होते, असं त्यांनी म्हटलं आहे.