कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तज्ज्ञांनी माणसांसाठी लस तयार कली. त्यानंतर आता प्राण्यांना वाचवण्यासाठी लस आवश्यक असल्याचं समोर आलं आहे. हाच विचार करता आता प्राण्यांसाठी देखील कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे.
हरियाणाच्या हिसारमधील केंद्रीय अश्व संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्राण्यांसाठी कोरोनाची पहिली लस तयार केलीये. आता केंद्र सरकार सिंह आणि बिबट्यांवर या लसीची चाचणी घेण्याचा विचार करतंय. यावेळी एक चाचणी केली असता २३ श्वानांवर ही लस तपासली गेली आहे. लस दिल्याच्या २१ दिवसांनंतर सर्वांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचं आढळून आलं आहे.
गुजरातमधील जुनागढमध्ये असलेल्या सक्करबाग प्राणीसंग्रहालय हे सिंहांच्या प्रजननासाठी नोडल सुविधा आहे. ज्यामध्ये ७० पेक्षा जास्त सिंह आणि ५०बिबट्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या १५ जनावरांवर कोरोना लसीची चाचणी केली जाणार आहे. या प्राण्यांना २८ दिवसांच्या अंतराने लसीचा दुसरा डोस दिला जाईल. दुसऱ्या डोसनंतर, प्राण्यांवर सुमारे दोन महिने अँटीबॉडी विकसित करण्यासाठी निरीक्षण केलं जाणार.
यासंदर्भात प्राणिसंग्रहालयाचे संचालक अभिषेक कुमार म्हणाले की, केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्राण्यांवर लसीकरण चाचणी सुरू करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी चेन्नईच्या वंदलूर प्राणीसंग्रहालयातील १५ सिंहांचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या सिंहांना डेल्टाची लागण झाल्याचं चाचणीत समोर आलेलं.
या व्हायरसचा माणसाकडून प्राण्यांमध्ये आणि नंतर प्राण्यांपासून माणसांमध्ये प्रसार झाल्याचे अनेक अभ्यासतून समोर आलं आहे. अशा स्थितीत प्राण्यांमध्येही त्याला रोखणं गरजेचं आहे. त्यानंतरच केंद्र सरकारने प्राण्यांसाठी कोरोनाची लस विकसित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.