जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नवनवीन आजार समोर येत आहेत. संशोधकांनी आता किडनी आणि लिव्हरशी संबंधित एक नवा आजार शोधून काढला आहे. या आजाराचा संबंध सीलियोपॅथीशी (ciliopathy) आहे. लहान मुलं आणि मोठ्यांमधल्या किडनी, लिव्हर फेल्युअरसाठी (Failure) हा आजार कारणीभूत ठरतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. किडनी आणि लिव्हरशी संबंधित टीयूएलपी3 (TULP3) हा नवा आजार शोधण्यात संशोधकांना यश आलं आहे.
सीलियोपॅथीशी संबंधित या आजारामुळे किडनी आणि लिव्हर फेल होऊ शकतं, असा दावा न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. टीयूएलपी3 सीलियोपॅथी हा एक धोकादायक आजार असून, त्याचं निदान झाल्यानंतर लिव्हर आणि किडनीच्या रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल. आतापर्यंत या आजाराविषयी माहिती नसल्याने उपचार अशक्य होते. किडनी आणि लिव्हर फेल होण्याची अनेक कारणं आहेत. ही कारणं न समजल्यानं उपचार करणं अशक्य होतं आणि अशी स्थिती जीवघेणी ठरते, असं संशोधकांनी सांगितलं.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराने ग्रस्त असलेल्या 15 रुग्णांचा संशोधनात समावेश करण्यात आला. या आजाराच्या लक्षणांवर लक्ष ठेवल्यानंतर लिव्हर बायोप्सी (Biopsy) केली गेली. त्यानंतर लिव्हरच्या नमुन्याचं जेनेटिक सिक्वेन्सिंग करण्यात आलं. युरिनचे नमुने घेतले गेले. तपासणीदरम्यान टीयूएलपी3 सीलियोपॅथीची कारणं स्पष्ट झाली. जनुकांमध्ये बदल झाल्यानं हा आजार होतो. संशोधनात सहभागी झालेल्या रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांना या आजारामुळे लिव्हर किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावं लागलं.
संशोधन जॉन सायर म्हणाले, "या आजाराच्या नव्या कारणांचा शोध लागल्यामुळे भविष्यात अधिकाधिक रुग्णांना मदत मिळू शकेल आणि त्यांच्यावर योग्य उपचार करणं शक्य होईल. किडनी आणि लिव्हरच्या रुग्णांमध्ये आनुवंशिक रोगाचं निदान करणं रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी एक मोठी दिलासा देणारी बाब ठरेल. कारण बहुतेक रुग्णांमध्ये कुटुंबातला सदस्य लिव्हर किंवा किडनीपैकी एक अवयव दान करत असतात. या रुग्णांमध्ये किडनी आणि लिव्हरमध्ये होणारं नुकसान रोखता येईल आणि विनाकारण ट्रान्सप्लांटची गरज कमी केली जाऊ शकेल. हे नवं संशोधन रुग्णांना दिलासा देणारे ठरेल."
`द ट्रिब्यून`च्या अहवालानुसार, न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे संशोधक जॉन सायर यांनी सांगितलं, 'आमचं संशोधन किडनी आणि लिव्हरच्या काही रुग्णांना होणाऱ्या या आजारावरच्या उपचारांमध्ये मोठा बदल घडवून आणू शकतं'. लिव्हर आणि किडनीशी संबंधित टीयूएलपी3 सीलियोपॅथी या जीवघेण्या आजाराचं सर्वांत मोठं कारण जनुकीय बदल हे आहे. जनुकांमध्ये दोष निर्माण झाल्याने हा आजार बळावतो आणि हे दोन्ही अवयव निकामी करतो. त्यामुळे या रुग्णांना ट्रान्सप्लांट करण्याशिवाय अन्य पर्याय उरत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.